शेतकरी पित्याचे छत्र हरपल्यावर दिवस ढकलण्याचेच वांधे

By admin | Published: November 4, 2015 10:53 PM2015-11-04T22:53:14+5:302015-11-04T23:09:18+5:30

चिमुकल्यांची व्यथा: आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची दिवाळी लोकांच्या दातृत्वावरच अवलंबून‘त्याचे’ नाव साहिल...

After the defeat of the umbrella of the farmer, | शेतकरी पित्याचे छत्र हरपल्यावर दिवस ढकलण्याचेच वांधे

शेतकरी पित्याचे छत्र हरपल्यावर दिवस ढकलण्याचेच वांधे

Next

नाशिक : वय जेमतेम पाच-सहा वर्षांचे... शाळेत पहिलीत शिकतो. सहा महिन्यांपूर्वी साहिलच्या आई-वडिलांनी शेतीच्या कर्जाला कंटाळून आत्महत्त्या केली. मूळ बुलडाणा जिल्ह्यातल्या साहिलला स्वत:चे पूर्ण नावही सांगता येत नाही आणि त्याच्या आई-वडिलांविषयी विचारण्याची आपली हिंमत होत नाही; पण ‘घरची आठवण येते का’ विचारल्यावर फक्त त्याचे डोळे बोलत राहतात...
त्र्यंबकेश्वरजवळच्या आधारतीर्थ आधाराश्रमात साहिल सहा महिन्यांपूर्वी दाखल झाला. या आश्रमात राहणाऱ्या अनेक मुलांच्या कहाण्या साहिलप्रमाणेच काळजाला अक्षरश: घरे पाडणाऱ्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या हा विषय सध्या सर्वदूर गाजत असला, तरी त्याची खरी भीषणता या मुलांकडे पाहिल्यावर जाणवते. त्र्यंबकेश्वरजवळच्या अंजनेरी भागात सन २००७ मध्ये त्र्यंबकराव गायकवाड यांनी आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी या आधारतीर्थाची स्थापना केली. सध्या या आश्रमात विदर्भ, बीड, बुलडाणा, गडचिरोली, नंदुरबार, जालन्यासह राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांची ११० निराधार मुले-मुली राहतात. त्यात ५० मुले आणि ६० मुलींचा समावेश आहे. वयोगट ६ ते १८ चा. आश्रमाच्या स्थापनेमागे बहुतांश वारकरी संप्रदायातील मंडळी आहेत. गावोगावी कीर्तनासाठी गेल्यावर आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांविषयी आवाहन केले जाते. त्या गावातल्या मुला-मुलीला खरोखर कोणाचा आधार नसेल, तर आधारतीर्थात आणले जाते. मुलांच्या निवास-भोजनाचा सगळा खर्च आश्रमाच्या वतीने केला जातो. मुख्यत: देणग्या, दानशूरांच्या मदतीवर हा डोलारा सांभाळला जातो. आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीच येथे स्वयंपाक व अन्य व्यवस्था पाहतात. काही मोठी मुले त्यांना मदत करतात. अडीच किलोमीटरच्या तळवाडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही मुले शिकतात. या मुलांची दिवाळी लोकांवर अवलंबून असते. कोणी ना कोणी फटाके, नवे-जुने कपडे, फराळ, मिठाई वगैरे आणून देते. त्यावर मुलांची दिवाळी साजरी होते.
आधाराश्रमाचे व्यवस्थापक विशाल परुळेकर सांगतात, ‘एकदा दिवाळीत या रस्त्यावरून जात होतो. सण असूनही या आश्रमात सारे काही शांत-शांत होते. आपल्यासाठी कोणी येते का, याची वाट पाहत ही मुले दारात बसून होती. ते पाहून वाईट वाटले आणि बोरिवलीतला व्यवसाय सोडून बायको-मुलांसह येथे येऊन राहण्याचा निर्णय घेतला. या मुलांचे आई-वडील असते, तर यांची दिवाळी जोरात झाली असती; पण त्यांना दिलासा देण्यासाठी लोकांनी येथे येऊन दिवाळी साजरी करावी, असे आवाहन आम्ही यंदा करीत आहोत... ’
एरवी लोक जुने कपडे, वापरलेल्या शालेय वस्तू आधाराश्रमात आणून देतात. काही कंपन्या, काही व्यक्ती दरमहा किराणा वगैरेची मदत करतात. आश्रमातली मुले पहाटे पाच वाजता उठतात. साडेदहाला जेवण करून शाळेत जातात. सायंकाळी पाचला पुन्हा परत. मग प्रार्थना, अभ्यास. काही मुलांचे आई-वडील अशा दोघांचेही निधन झालेले आहे, तर काही मुले वडील गेल्याने आईसोबत राहत आहेत.
असाच एक चिमुकला. त्याच्या वडिलांनी आत्महत्त्या केलेली. आईने दुसरा विवाह केल्यावर याची रवानगी आधाराश्रमात झालेली. आता हा सावत्र बाप या एवढ्याशा पोराला सांगतो, ‘इकडे पाय ठेवला तर मारून टाकील...’ त्याची आई बिचारी कधी चोरून-लपून एखादा फोन करते तेवढाच. अशा मन सुन्न करणाऱ्या अनेक कहाण्या इथे ऐकायला मिळतात.
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीचा विषय या मुलांकडे काढल्यावर त्यांचे काळवंडलेले चेहरे उजळतात खरे; पण तात्पुरतेच... कारण अंधारलेल्या भविष्याच्या काळजीने त्यांच्या चेहऱ्याचा लगेच ताबा घेतलेला असतो...

 

Web Title: After the defeat of the umbrella of the farmer,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.