निवडणुकीनंतरच वाजणार फटाके
By admin | Published: October 11, 2014 09:47 PM2014-10-11T21:47:47+5:302014-10-11T21:47:47+5:30
निवडणुकीनंतरच वाजणार फटाके
नाशिक : शहराच्या विविध भागात अधिकृतरीत्या फटाक्यांची दुकाने थाटण्यासाठी महापालिकेने मतदानानंतरचा मुहूर्त निवडला आहे. १६ तारखेपासून दुकानांच्या जागांचे लिलाव होणार आहेत. त्यानंतर १८ ते २५ असा केवळ आठ दिवसांचा कालावधीच व्यवसायासाठी मिळणार असून, त्यामुळे उलाढाल काहीशी कमी होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या वतीने विविध विभागांत फटाके विक्रीसाठी जागा निश्चित केल्या जातात आणि लिलाव पद्धतीने व्यावसायिकांना दिल्या जातात. यंदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाची परवानगी घेण्यास विलंब झाला. ही परवानगी मिळाल्यानंतर महापालिकेने सहाही विभागांत एकूण ३२ जागांवर १७९ गाळ्यांचे लिलाव घेण्याचे निश्चित केले आहे. यात पूर्व विभागात ६, पश्चिम विभागात २, पंचवटी विभागात १०, नाशिकरोडला ३, सातपूरला ६ आणि सिडकोत ५ अशा ३१ ठिकाणी गाळ्यांच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. पूर्व, पश्चिम आणि पंचवटी या तीन विभागांत मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६, तर उर्वरित तीन विभागांमधील जागांसाठी १७ आॅक्टोबर रोजी लिलाव होणार आहेत. त्यानंतर १८ ते २५ या कालावधीसाठीच फटाक्यांचे गाळे थाटण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांना जेमतेम ७ ते ८ दिवस परवानगी मिळणार आहे. साधारणत: गणपतीमूर्ती विक्री करणाऱ्यांप्रमाणेच फटाके व्यावसायिकांना दहा ते पंधरा दिवस आवश्यक आहेत, परंतु तेवढा कालवधी यंदा मिळणार नसल्याने उलाढाल मंदावण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)