पाच वर्षांनंतर थांबला उत्खननाचा खडखडाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:11+5:302021-06-24T04:12:11+5:30
पर्यावरण संतुलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या टास्क फोर्सच्या पहिल्याच बैठकीत सारूळ शिवारातील संतोषा आणि भागडी डोंगरावरील अवैध उत्खननास बंदी करण्याचा ...
पर्यावरण संतुलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या टास्क फोर्सच्या पहिल्याच बैठकीत सारूळ शिवारातील संतोषा आणि भागडी डोंगरावरील अवैध उत्खननास बंदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी येथील उत्खनन बंद झाल्याचे दिसून आल्याने ग्रामस्थांनी या निर्णयाचा सत्कारात्मक परिणाम झाल्याने समाधान व्यक्त केले आहे. बैठकीतील चर्चेतून प्रत्यक्षात काहीसा दिलासा मिळाला असला तरी खरोखरीच येथील कामकाज बंद होणार का, अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.
या डोंगराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या साहित्यांनी उत्खनन केले जात असल्याने त्यास सातत्याने हरकत घेतली जात आहे. विपुल जैवविविधता तसेच दुर्मीळ प्रजातीच्या वनस्पती या ठिकाणी असल्याने या डोंगरांचे संरक्षण व्हावे, यासाठीचे प्रयत्न पर्यावरणप्रेमी तसेच बेलगाव ढगा ग्रामस्थांकडून सुरू आहेत. पर्यावरणाचे रक्षण तसेच विकासाचा मार्ग यातील अडथळे दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत या दोन्ही डोंगरांवर महत्त्वपूर्ण चर्चा हाेऊन बंदीचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या केवळ निर्णयामुळे या दोन्ही डोंगरांवरील उत्खननाचे कामकाज बंद झाले असले तरी याबाबतचे अधिकृत आदेश काढण्याची प्रतीक्षा ग्रामस्थांना आहे. अशा आदेशामुळे कायदेशीरदृष्ट्या उत्खनन बंद करण्याची मोठी मदत होणार असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आता हे काम बंद दिसत असले तरी पुढे कधीही सुरू होऊ शकते. त्यामुळे आदेश लवकरात लवकर काढावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.