ललित नंतर आता सनी पगारे नवा ड्रग्जमाफिया! सोलापुरात 'उद्योग', नाशकात बाजार; पोलिसांनी केला भांडाफोड
By अझहर शेख | Published: October 28, 2023 02:43 PM2023-10-28T14:43:57+5:302023-10-28T14:46:37+5:30
बंद पडलेल्या कारखान्यात एमडी निर्मिती...
नाशिक : राज्यभरात गाजत असलेल्या संशयित ड्रग्जमाफिया ललित पानपाटीलच्या प्रकरणानंतर एक धक्कादायक असे नवीन एमडी ड्रग्जचे प्रकरण नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या विशेष टास्क फोर्सच्या सोलापूरमधील कारवाईनंतर समोर आले आहे. नाशिक पोलिसांच्या हाती लागलेला ड्रग्जमाफिया संशयित सनी अरुण पगारे हा चक्क सोलापूरात एमडीचा कारखाना चालविला होता, अशी माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाशिकच्या तीन पथकांनी सोलापूरातील मोहोळ येथे जाऊन हा कारखाना उद्धवस्त करत ६ किलो ६०० ग्रॅम इतका एमडी पावडरचा साठा जप्त केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
नाशिक शहर पोलिसांनी ७सप्टेंबर रोजी नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सामनगाव रस्त्यावर संशयित संजय गणेश शर्मा यास १२.५ग्रॅम एमडी पावडरची विक्री करताना रंगेहात ताब्यात घेतले होते. त्या गुन्ह्याचा तपास पुढे अमली पदार्थविरोधी पथकाने हाती घेत शृंखला शोधण्यास सुरूवात केली. साकीनाका पोलिसांच्या शिंदे गावातील कारवाईनंतर अंकुश शिंदे यांनी अमली पदार्थविरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट-१च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संयुक्तिक विशेष टास्क फोर्स स्थापन करून गुन्ह्याचा सखोल तपास करत मुळाशी जाऊन छडा लावण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय ढमाळ, दिवाणसिंग वसावे, हेमंत फड यांच्या पथकाने शर्माला एमडी देणारे संशयित अर्जुन पिवाल, मनोज गांगुर्डे, सनी पगारे, सुमीत पगारे यांच्यासह मुंबईतून भुषण उर्फ राजा माेरे यांच्या मुसक्या बांधल्या.
या टोळीने नाशिकमध्ये एमडी ड्रग्जविक्रीचे जाळे विणले होते. पोलिस कोठडीत त्यांची कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडून तीन ते साडेतीन किलो एमडी पावडर जप्त केली. त्यांनी ही पावडर कोठून व कशी आणली याचा शोध घेताना पोलिसांना कारखाना चालविला जात असल्याची माहिती मिळाली. हा कारखाना नाशिकमध्ये आहे, की नाशिकच्याबाहेर हे मात्र लवकर स्पष्ट होत नव्हते. विशेष पथकाने परिश्रम घेत तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी सनी पगारेला ‘खाक्या’ दाखिवला. त्यानंतर त्याने सोलापूर कारखान्याची कबुली पोलिसांकडे दिली.
बंद पडलेल्या कारखान्यात एमडी निर्मिती
मोहोळ येथे एक बंद पडलेली स्वामी समर्थ नावाची रासायनिक कंपनी भाडेतत्वावर घेऊन त्यामध्ये एमडी ड्रग्ज निर्मितीचा ‘उद्योग’ या पगारेने चालविला असल्याची खात्री पटल्यानंतर तीन पथके सोलापूरच्यादिशेने रवाना झाली. शु्क्रवारी सकाळपासून पथकाने मोहोळ भागात कारवाई करत तेथून ६ किलो ६००ग्रॅम शुद्ध एमडी पावडरसह एमडी सदृश्य १४ किलो २३०ग्रॅम पावडर जप्त केली. तसेच कारखाना उभा करण्यास हातभार लावणारा नाशिकचा संशयित मनोहर पांडुरंग काळे यास अटक केली. तसेच सोलापूरातूनसुद्धा एका संशयिताला चौकशीसाठी या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात दोन संशयित निष्पन्न झाले असून ते फरार असून पोलिस त्यांना शोध घेत आहेत.