मध्यस्थीनंतर सराफ बाजारातील बहिष्कार मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:10 AM2019-10-22T01:10:14+5:302019-10-22T01:10:52+5:30
फुुलबाजारातील सुलभ शौचालय हटवेपर्यंत मतदानावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा परिसरातील नागरिकांनी स्वीकारला होता. मात्र, प्रशासनाच्या वतीने सरकारवाडा पोलीस निरीक्षकांनी मागण्या प्रशासनाकडे मांडून आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तेथील नागरिकांनी आंदोलन मागे घेत मतदान केले.
नाशिक : फुुलबाजारातील सुलभ शौचालय हटवेपर्यंत मतदानावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा परिसरातील नागरिकांनी स्वीकारला होता. मात्र, प्रशासनाच्या वतीने सरकारवाडा पोलीस निरीक्षकांनी मागण्या प्रशासनाकडे मांडून आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तेथील नागरिकांनी आंदोलन मागे घेत मतदान केले.
सराफ बाजार, शुक्ल गल्ली आणि दहीपुलातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते सुलभ शौचालय अत्यंत हानीकारक ठरत आहे. विशेषत्वे पावसाळ्यात आणि पुराचे पाणी सर्वदूर पसरल्यावर त्या शौचालयामुळे आरोग्याची समस्या गंभीर होत चालली आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक स्तरावर निवेदने देऊनही प्रश्न सोडवला जात नसल्याने मतदानावर बहिष्काराचे हत्यार उपसण्यात आले होते.
आनंद गर्गे, प्रकाश पगारे, किशोर पाठक, मनोज लुनावत, हेमंत जगताप, निनाद नांदुर्डीकर, विजय राऊत, दत्तात्रय राऊत, सत्यम शाह, चेतन राजापूरकर आदी कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत नागरिकांना मतदान न करण्याचे आवाहन करीत तशा आशयाचे फलकदेखील परिसरात लावले.
मतदारांनी बहिष्कार टाकल्याची माहिती मिळताच प्रशासनाकडून त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. सरकारवाडाचे पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी सर्व मतदारांच्या मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी प्रशासनापर्यंत पोहोचवून आवश्यक ते सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा मागे घेतला. त्यानंतर नागरिकांनी सुरळीतपणे मतदान केल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला.