मुंबई-पुण्यापाठोपाठ नाशिक शहर ‘डेंग्यू’च्या डेंजर झोनमध्ये कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 06:31 PM2018-01-01T18:31:24+5:302018-01-01T18:32:38+5:30
चिंताजनक : २०१७ मध्येही ९०० हून अधिक रुग्णांना लागण
नाशिक - गेल्या तीन वर्षांपासून नाशिक शहर डेंग्यूच्या विळख्यातून अद्याप बाहेर पडलेले नाही. मुंबई-पुण्यानंतर नाशिक ‘डेंग्यू’च्या डेंजर झोनमध्ये कायम असून सन २०१७ मध्ये वर्षभरात २१६८ संशयितांपैकी ९४१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या दप्तरी आहे.
गेल्या तीन वर्षांपासून नाशकात डेंग्यूच्या आजाराने नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. महापालिकेकडे असणारा कर्मचा-यांचा अभाव व पेस्टकंट्रोलबाबत वाढत्या तक्रारी यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे अवघड होऊन बसले. डिसेंबर २०१७ मध्ये डेंग्यूचे ३७४ संशयित रुग्ण आढळून आले. त्यातील १६९ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. डिसेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात १८७, दुस-या आठवड्यात ९०, तिसºया ६१ तर चौथ्या आठवड्यात ३६ रुग्ण आढळून आले आहेत. नोव्हेंबर महिन्यात ६४४ संशयितांपैकी २७६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. डिसेंबर महिन्यात डेंग्यूचा प्रभाव काही प्रमाणात ओसरला असला तरी धोका मात्र कायम आहे. सन २०१६ मध्ये २३६९ संशयितांपैकी ९३० रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद आहे तर सन २०१७ मध्ये २१६८ संशयितांपैकी ९४१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत फरक पडलेला नाही. त्यामुळे डेंग्यूच्या डेंजर झोनमध्ये नाशिक अजूनही कायम आहे. महापालिकेच्यावतीने डेंग्यूच्या नियंत्रणासाठी प्रबोधनपर मोहीम राबविली जात असली तरी पुरेशा कर्मचा-यांअभावी ती सर्वांपर्यंत जाऊन पोहोचू शकलेली नाही. दरम्यान, महापालिकेने आता नवीन बांधकामे आणि गॅरेजेस यांच्याकडे लक्ष केंद्रीत केले असून डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्यास संबंधितांना नोटीसा बजावण्याचे काम सुरू आहे. लवकरच याबाबत दंडात्मक कारवाई करण्यासंबंधीचा प्रस्ताव महासभेवर सादर केला जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
आता मलेरियाचा धोका
जानेवारी महिन्यात जसे ऊन पडू लागेल त्यानुसार नदी-नाले, गटारीच्या तुंबलेल्या पाण्यात क्यूलेक्स जातीच्या मच्छरांची उत्पत्ती वाढत जाईल. मादी क्यूलेक्स मच्छर ही मलेरियाची वाहक समजली जाते. त्यामुळे आता मलेरियाचा धोका वाढणार असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नदी-नाले तसेच तुंबलेल्या गटारी साफ करण्याविषयी बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. याशिवाय, गोदावरी संवर्धन कक्षामार्फत गोदावरी नदीतील गाळ, घाण-कचरा काढण्याचे काम सुरू आहे. सेप्टीक टॅँकमध्येही फवारणी करण्याचे आदेश पेस्टकंट्रोल ठेकेदाराला देण्यात आले आहेत.