दीड महिन्यानंतरही प्रवेशाचा घोळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:08 AM2019-07-22T01:08:01+5:302019-07-22T01:08:28+5:30
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्राथमिक शाळा १५ जूनलाच सुरू झाल्या असून, शाळा सुरू होऊन सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटत आल्यानंतरही आरटीई प्रवेशाचा घोळ सुरू आहे.
नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्राथमिक शाळा १५ जूनलाच सुरू झाल्या असून, शाळा सुरू होऊन सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटत आल्यानंतरही आरटीई प्रवेशाचा घोळ सुरू आहे. आरटीई प्रवेशाची तिसरी सोडत जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सुरुवातीला १८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. या विहित मुदतीत अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण होऊ न शकल्याने शिक्षण विभागाने प्रवेशासाठी २४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार २२२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत, तर नाशिकसह राज्यभरात ७५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.
आरटीई प्रवेशासाठी पडताळणी समितीकडे जाऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत नाशिक शहर व जिल्ह्यातील ४ हजार २२२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. दरवर्षी डिसेंबरमध्ये सुरू होणारी ही प्रक्रिया यंदा फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरू झाली. त्यानंतर एप्रिलच्या दुसºया आठवड्यात पहिली सोडत जाहीर करण्यात आली. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश घेण्यास दोनदा मुदतवाढ देण्यात आली. त्यातही महिनाभराचा कालावधी गेल्याने पहिल्या सोडतीनंतर तब्बल दोन महिने उलटल्यानंतर दुसरी सोडत जाहीर करण्यात आली. आरटीईच्या दुसºया सोडतीत ३६५ शाळांत दोन हजार ३७ मुलांची निवड झाली होती. त्यातील १ हजार १८८ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. प्रवेशापासून हजारो विद्यार्थी वंचित राहिल्याने तिसरी सोडत जाहीर करण्यात आली. त्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना एमएसएसद्वारे तसेच संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली. पडताळणी समितीकडे जाऊन २० जुलैपर्यंत सुमारे ४ हजार २२२ विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे.
अर्ज अडीच लाख प्रवेश केवळ ७५ हजार
आरटीईच्या राज्यभरात ९ हजार १९५ शाळा असून, त्यात १ लाख १६ हजार ८०८ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी तब्बल २ लाख ४५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील पहिल्या तिन्ही फेऱ्यांमध्ये केवळ १ लाख २४ हजार विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यापैकी केवळ ७५ हजार ६४९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.