कामाची मुदत संपून एक वर्ष उलटूनही भगूर रेल्वे उड्डाणपूल अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:33 AM2018-07-12T00:33:15+5:302018-07-12T00:33:56+5:30
भगूर रेल्वेगेट उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपून एक वर्ष उलटूनही अद्याप काम पूर्ण न झाल्याने ते पूर्ण कधी होणार, असा सवाल नागरिक करीत असून, रेल्वेच्या तांत्रिक मंजुरीअभावी काम पूर्ण होण्यात अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
नाशिक : भगूर रेल्वेगेट उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपून एक वर्ष उलटूनही अद्याप काम पूर्ण न झाल्याने ते पूर्ण कधी होणार, असा सवाल नागरिक करीत असून, रेल्वेच्या तांत्रिक मंजुरीअभावी काम पूर्ण होण्यात अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
सिन्नर, इगतपुरी या तालुक्यांसह भगूर परिसरातील नागरिकांची दळणवळणाची सोय होऊन विकासाला गती मिळावी म्हणून केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत माजी खासदार समीर भुजबळ यांच्या निधीतून भगूर रेल्वेगेट नं. ८५ वर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने २२ सप्टेंबर २०१५ रोजी उड्डाणपुलाच्या कामास तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली होती. या कामाचा ठेका धुळे येथील बाळासाहेब भदाणे यांना १५ कोटी ५१ लाख ५८ हजार ५३२ रुपयांस देऊन ते २१ मार्च २०१७ पर्यंत म्हणजे १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे शासनाने निर्देश दिले होते, तरीही आज मितीला मुदत संपून १५ महिने झाले तरी पुलाचे बरेच काम बाकी आहे. यासंदर्भात कामगारांना विचारले असता, कामाच्या कालावधीची मुदत वाढवून मिळाली असल्याचे सांगण्यात आले.
उड्डाणपुलासाठी लागणारे काही बांधकाम साहित्य पुणे येथे बनविण्यात आले असून, ते बसविण्यासाठी त्याची तांत्रिक मान्यता रेल्वे बोर्डाकडून घ्यावी लागते. अशा प्रकारचे साहित्य तयार असले तरी, रेल्वेकडून त्याच्या तपासणीसाठी विलंब लावला जात असल्यामुळेच पुलाचे काम पुढे सरकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु रेल्वेच्या या वेळकाढूपणाचा फटका नागरिकांना बसत असून, दळणवळणाच्या सोयीपासून वंचित राहावे लागत आहे.