पावसानंतर आता साथीच्या आजाराचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 04:33 PM2019-11-07T16:33:46+5:302019-11-07T16:34:16+5:30
निफाड तालुका : शेतशिवारात साचले पाणी
चांदोरी : पावसाने धुडगूस घातल्यानंतर आता निफाड तालुका परिसरात विविध साथीच्या आजारांनी थैमान घातले असून नागरिक हैराण झाले आहेत. गावात-शेतशिवारात पाण्याची डबकी साचली असून गवत वाढल्यामुळे डेंग्यूसदृश थंडी ताप, खोकला व साथीच्या आजारांच्या रु ग्णात वाढ झाली आहे. खासगी दवाखाने हाऊसफुल झाले आहेत.
गेल्या काही दिवसात भरपूर पाऊस झाल्याने शेतशिवारासह गावांमध्ये चिखल साचून डबकी तयार झाली आहेत. गाजरगवतही मोठया प्रमाणात उगवले आहे. डबक्यामध्ये कचरा ,गवत ,चिखल असल्याने मोठया प्रमाणत दुर्गंधी येत आहे. याशिवाय डासांची मोठया प्रमाणत पैदास होत आहे. त्यामुळे डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याशिवाय, थंडीताप व खोकला या मुळे लहान मुले हैराण झाली असून खासगी दवाखान्यात उपचारांसाठी गर्दी होताना दिसत आहे. काहींना चांदोरी, निफाड ,ओझर किंवा नाशिक येथे जावे लागत आहे. डास नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने व ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दारणासांगवी येथील बोडके वस्ती ते कदम वस्ती या दरम्यान गेल्या चार महिन्यांपासून पाणी साचलेले असून या संदर्भात काही दिवसांपूर्वी सरपंचांसह तलाठ्यांकडून आढावा घेण्यात आला होता. परंतु, पुढे कार्यवाही झालेली नाही.
आणखी ठोस उपाययोजना
डासांची पैदास होऊ नये यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच गावात व मळ्यात धूरळणी केली आहे. गरज पडल्यास आणखी ठोस उपाययोजना राबविल्या जातील. सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
- संगीता माळी, सरपंच, दारणसांगवी