राज यांच्यापाठोपाठ आता चंद्रकांत पाटीलही नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:54+5:302021-07-15T04:11:54+5:30
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम सुरू झाले आहेत. मध्यंतरी शिवसेना नेते खासदार संजय राऊत नाशिकमध्ये येऊन गेले. त्यांचा दौरा अचानक ...
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम सुरू झाले आहेत. मध्यंतरी शिवसेना नेते खासदार संजय राऊत नाशिकमध्ये येऊन गेले. त्यांचा दौरा अचानक बदलला असला तरी शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकांचा सध्या जोर सुरू आहे. महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे दररोजच कोणत्या ना कोणत्या विभागात बैठका घेत आहेत. त्यांच्या पाठाेपाठ आता राज ठाकरेदेखील शुक्रवारपासून (दि. १६) नाशिकमध्ये येत आहेत. त्यांचा तीन दिवसीय दौरा असून, त्यापाठोपाठ आता शनिवारपासून दोन दिवस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील नाशिकमध्ये येणार आहेत.
रविवारी (दि. १८) दिवसभर ते संघटनात्मक बैठका घेणार आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुका सहा महिन्यांवर आल्या आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, त्याचबरोबर संघटनात्मक बेदिलीही वाढत आहे. बहुतांश पदाधिकाऱ्यांचा महापालिकेत हस्तक्षेप आणि स्वारस्य आहे. त्यामुळे खरेतर वाद शमत नाही. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना कधी शहराध्यक्ष हटाव तर कधी गटनेते हटाव असे कार्यक्रम सुरू आहेेत. मध्यंतरी गटनेते बदलण्यात आले, त्यानंतर स्थायी समितीत ज्या प्रस्थापितांना स्थान दिले ते राजीनामे देणार असे जाहीर करण्यात आले. मात्र, त्यानंतरही ते देण्यात आलेले नाहीत. शहराची सूत्रे माजी मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे असली तरी प्रत्यक्षात निर्णय अन्य नेते घेतात, अशाही तक्रारी आहेत. या सर्वच बाबींवर रविवारी (दि. १८) चर्चा होण्याची शक्यता आहे.
इन्फो...
मनपातील कामे जनतेपर्यंत कोण पोहोचवणार
महापालिकेत पक्षाच्या काळात झालेली अनेक कामे आहेत. मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना, नुकतीच सुरू झालेली बस सेवा, १७ नवे जलकुंभ, बिटको रुग्णालयाचा शुभारंभ, तीनशे कोटी रुपयांचे रस्ते अशी अनेक कामे झाली आहेत. बस सेवा लोकार्पण कार्यक्रमाच्या वेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी या कामांची जंत्रीच वाचून दाखविली. मात्र, प्रत्यक्षात ही कामे लाेकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सध्या कोणताही उपक्रम पक्षाकडे नाही.