२७ किलोमीटरचा पल्ला गाठत ३६ तासानंतर भोजापूरचे आवर्तन पोहचले पिंपळे तलावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 05:51 PM2018-12-03T17:51:43+5:302018-12-03T17:52:09+5:30
नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून सोडलेले आवर्तन तब्बल २७ किलोमीटरचा प्रवास करत ३६ तासानंतर संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे शेवटच्या टोकाला रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोहचले.
नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून सोडलेले आवर्तन तब्बल २७ किलोमीटरचा प्रवास करत ३६ तासानंतर संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे शेवटच्या टोकाला रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोहचले. धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामातील पिकांना हे आवर्तन दिले जाणार आहे. इतिहासात प्रथमच पोलीस बंदोबस्तात भोजापूर धरणातील आवर्तन सोडण्यात आले आहेत.
सिन्नर तालुक्यातील यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे भोजापूर धरणातील पाण्याला महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भोजापूर धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातून केली जात होती. त्यानंतर भोजापूर धरणातून आवर्तन सोडण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे चार दिवस उशिरा पाटबंधारे विभागाने शनिवारी (दि.१) रोजी पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडले. डाव्या व उजव्या कालव्यांवरील लाभधारक शेतकरी व नागरिकांच्या आशा त्यामुळे पल्लवीत झाल्या आहेत.