‘कालिदास’चे नूतनीकरण आचारसंहितेनंतर
By Admin | Published: February 3, 2017 12:47 AM2017-02-03T00:47:00+5:302017-02-03T00:47:12+5:30
आयुक्त : नाशिकरोडच्या नाट्यगृहासाठी कलावंतांच्या सूचना
नाशिक : महापालिकेच्या कालिदास कलामंदिरातील अव्यवस्थेबद्दल ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावरून प्रशासनाचे वाभाडे काढल्यानंतर कालिदासच्या नूतनीकरणाच्या प्रक्रियेला आता निवडणूक आचारसंहितेनंतर वेग येणार आहे. दरम्यान, नाशिकरोड येथे दसक भागात उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहाच्या आराखड्यासाठी कलावंतांकडून सूचना मागविण्यात आल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.
महाकवी कालिदास कलामंदिरातील दुरवस्थेसंबंधीची छायाचित्रे काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावरून शेअर केली होती. त्याला नंतर राजकीय वळण लागून मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी दामले यांचा समाचार घेतला होता. दामले यांना नाशिकच्याच नाट्यगृहांची दुरवस्था दिसली काय, असा खोचक सवालही खोपकर यांनी केला होता. त्यानंतर दामले यांनी स्वत: खुलासा करत आपण केवळ वस्तुस्थिती समोर आणल्याचे म्हटले होते.
कालिदास कलामंदिरच्या बाबतीत वाभाडे निघाल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी त्याबाबत गांभीर्याने दखल घेत कालिदासच्या नूतनीकरणाच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचा आराखडा तयार असून निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर त्याबाबत कार्यवाहीस सुरुवात होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
प्रामुख्याने, पावसाळ्यात जून-जुलैपासून कालिदासच्या कामास सुरुवात करण्यात येईल. त्यासाठी किमान आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने नाट्यव्यावसायिकांना पर्यायी स्वरूपात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठी गायकवाड सभागृहात तात्पुरत्या स्वरूपात सुधारणा करण्यात येणार आहे.
नाशिकरोड येथील दसक भागात ४८५ आसन क्षमतेचे नाट्यगृह साकारण्यात येणार असून, सुमारे १८ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या नाट्यगृहाची रचना नेमकी कशी असावी, याबाबत कलावंतांकडून सूचना मागविण्यात आल्याचेही आयुक्तांनी सांगितले.