दुसऱ्या लसीनंतर ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चिकटू लागल्या लोखंडासह स्टीलच्या वस्तू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:17+5:302021-06-11T04:11:17+5:30
नाशिक : कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसनंतर जुने सिडकोतील ज्येष्ठ नागरिक अरविंद जगन्नाथ सोनार (७२) यांच्या कंबरेपासून वरच्या भागातील ...
नाशिक : कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसनंतर जुने सिडकोतील ज्येष्ठ नागरिक अरविंद जगन्नाथ सोनार (७२) यांच्या कंबरेपासून वरच्या भागातील शरीराच्या उघड्या भागाला लोखंडी वस्तू चिकटत असल्याच्या प्रकाराने नाशिकसह सर्वत्र हा चर्चेचा, औत्सुक्याचा आणि वैद्यकीयदृष्ट्यादेखील चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे हा लसीकरणाचा परिणाम नसल्याचा दावा मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला असला, तरी त्याचे निश्चित कारण काय, याचा उलगडा मनपाच्या वैद्यकीय पथकाने केलेल्या पाहणीनंतरही त्यांनाही होऊ शकलेला नाही.
सोनार हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांनी मार्च महिन्यात नाशिक मनपाच्या सिडकोतील केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर, ८४ दिवस उलटून गेल्यानंतरदेखील मनपाच्या केंद्रावर कोविशिल्डसाठी नंबर न लागल्याने त्यांनी शहरातील एका खासगी रुग्णालयात जाऊन कोविशिल्डची दुसरी लस २ जूनला घेतली. दरम्यानच्या काळात त्यांचे चिरंजीव जयंत यांनी मोबाइलवर बघितलेल्या एका व्हिडीओमध्ये दुसऱ्या लसीनंतर संबंधित व्यक्तीच्या अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचे बघितले. त्याप्रमाणे त्यांनी वडिलांच्या अंगाला चमच्यासह स्वयंपाकघरातील छोटी ताटली, उचटणी अशा वस्तूदेखील त्यांच्या अंगाला चिकटत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्व कुुटुंबीयदेखील आश्चर्यचकित झाले. कदाचित, अंगाला घाम आला असल्याने असे घडले असेल, असे वाटून त्यांनी स्नान करून पुन्हा तोच प्रयोग करून पाहिला असता, स्टीलच्या, लोखंडाच्या वस्तू चिकटणे सुरूच होते.
कोट.
माझे १० वर्षांपूर्वी बायपास ऑपरेशन झाले असून त्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही ऑपरेशन झालेले नाही. विशेष म्हणजे लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही मला पहिल्या डोसप्रमाणेच अधिक उत्साह जाणवला. त्याआधीदेखील मला कुठलाही त्रास झालेला नाही. परंतु अंगाला स्टीलच्या, लोखंडी वस्तू कशा चिकटतात, हा मात्र संशोधनाचा विषय आहे. हा नक्की काय प्रकार आहे, याबद्दल मीदेखील जाणून घेण्यास उत्सुक आहे. त्यामुळे मनपा, शासनाच्या डॉक्टरांकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही तपासणीस, चौकशीस मी सहकार्य करणार आहे.
अरविंद सोनार,
ज्येष्ठ नागरिक, जुने सिडको
कोट.
लस घेतल्यानंतर अंगावर स्टील व लोखंडी वस्तू चिकटतात. हा कुठलाही दैवी प्रकार अथवा अंधश्रद्धादेखील नाही. त्यामागे काही वैद्यकीय कारण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी सखोल अभ्यास करून त्यातील सत्य बाहेर आणण्याचा प्रयास करावा.
कृष्णा चांदगुडे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
कोट
लसीकरणामुळे शरीरात कोणत्याही प्रकारचे हार्मोनल बदल होत नाहीत. कोणत्याही जर्नलमध्येदेखील हार्मोनल बदलाचे कोणतेही पुरावे मांडले गेलेले नाहीत. त्यामुळे या घटनेशी हार्मोनल बदल होण्याचाही काहीही संबंध नाही.
डॉ. सुजित चंद्रात्रे, एन्डोक्रायनोलॉजिस्ट
लसीकरणाचा संबंध नाही
या घटनेत लसीकरणाचा काही संबंध असेल असे वाटत नाही. दुसरी लस घेऊनदेखील आठवडा उलटून गेल्यानंतर हे त्यांच्या लक्षात आले असल्याने लसीमुळे ते झाले, असे वाटत नाही. मात्र, त्यांच्या शरीराला स्टील, लाेखंडाच्या वस्तू चिकटत आहेत, हे खरे आहे. लसीचा त्यात काही संबंध असता, तर अजून काही केसेस आपल्याला समजल्या असत्या. तरीदेखील त्यांच्या आरोग्याची, सध्या सुरू असलेल्या वैद्यकीय उपचारांची माहिती घेतली असून त्याबाबतचा अहवाल आपण शासनाकडे पाठवणार आहोत.
डॉ. अजिता साळुंखे, वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका