गोदावरीचा पूर बघून दुरूनच दर्शन घेऊन माघारी फिरावे लागले.
By admin | Published: August 7, 2016 01:39 AM2016-08-07T01:39:02+5:302016-08-07T01:39:19+5:30
गोदावरीचा पूर बघून दुरूनच दर्शन घेऊन माघारी फिरावे लागले.
पंचवटी : बहोत बरसोंसे गंगामाई का दर्शन करने की और गंगा में डुबकी लगाने की इच्छा थी, सुबह यहाँ घाटपर आये तो देखा पाणी बहोतही भरा हुआॅ है, तो हम लोगोंको वापस जाना पड रहा है, असे म्हणत देवदर्शनासाठी गंगाघाट परिसरात आलेल्या परराज्यातील भाविकांना गोदावरीचा पूर बघून दुरूनच दर्शन घेऊन माघारी फिरावे लागले.
मंगळवारचा पूर ओसरत नाही तोच शनिवारी पुन्हा गोदावरीला पूर आला. या पुराच्या पाण्याचा फटका परराज्यातून नाशिकला पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना बसला. शेकडो किलोमीटर प्रवास करून ज्या गोदामाईचे दर्शन व रामकुंडात स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांची पुरामुळे बोळवण झाली. परराज्यातून आलेल्या भाविकांना रामकुंड, नारोशंकर मंदिर, तपोवन परिसरात जाता आले; मात्र पुरामुळे लांबूनच दर्शन घ्यावे लागत होते. शनिवारीच्या दिवशी सकाळी गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदि राज्यांतून भाविक दर्शनासाठी आले होते. या भाविकांना गंगाघाट वगळता राममंदिर, सीतागुंफा, भक्तिधाम, काट्या मारु ती आदि मंदिरांचे दर्शन करता आले.
सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत दर्शनासाठी यायचे होते, परंतु खूप गर्दी असल्याने यायला जमले नाही. पावसाळ्यात धार्मिक स्थळांच्या ठिकाणी भाविकांची गर्दी कमी असते म्हणून आम्ही आमच्या नातेवाईक व मित्रपरिवारासह आलो पण गोदावरीचा पूर बघून आम्हाला लांबूनच दर्शन घेऊन माघारी परतावे लागत असल्याचे भाविकांनी बोलून दाखिवले.