विक्रेत्यांच्या विरोधानंतर अतिक्रमण मोहिमेला ब्रेक
By admin | Published: July 21, 2016 11:00 PM2016-07-21T23:00:08+5:302016-07-21T23:01:23+5:30
महापालिका : पश्चिम प्रभागची आज सभा
नाशिक : महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीच्या सभेत मेनरोड, रविवार कारंजा परिसरातील अतिक्रमणांबाबत वादळी चर्चा झडल्यानंतर अतिक्रमणविरोधी पथकाने मंगळवारी मोहीम राबविली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा मोहीम राबविण्यात आली. यावेळी सुमारे तीन ट्रक साहित्यही जप्त करण्यात आले. परंतु विक्रेत्यांच्या जमावाने मोहिमेला विरोधाची भूमिका घेतल्याने महापालिकेला मोहीम थांबवावी लागली. दरम्यान, शुक्रवारी (दि.२२) पश्चिम प्रभाग समितीची अतिक्रमणप्रश्नी विशेष सभा होणार आहे.
गेल्या सोमवारी झालेल्या पश्चिम प्रभाग समितीच्या सभेत माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ आणि अजय बोरस्ते यांनी मेनरोडसह परिसरातील अतिक्रमणप्रश्नी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानुसार, महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मंगळवारी मोहीम राबवत रस्त्यावरील विक्रेत्यांचे सुमारे दोन ट्रक साहित्य जप्त केले होते. गुरुवारीही पथकाने शालिमार, मेनरोड आणि रविवार कारंजा परिसरात पुन्हा एकदा मोहीम हाती घेतली. मोहीम सुरू असतानाच विक्रेत्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. अशातच मोठा जमाव जमल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्यामुळे पथकाने मोहीम थांबविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शुक्रवारी पश्चिम प्रभाग समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दुपारी ४ वाजता अतिक्रमणप्रश्नी विशेष सभा बोलाविली असून, त्यात पुन्हा एकदा मोहिमेविषयी प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.