सात फेरे झाले, पण 'बिदाई' नाही; लग्न लागताच नववधू माहेरी अन् नवरोबा 'क्वारंटाईन'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 03:44 PM2020-05-28T15:44:23+5:302020-05-28T15:48:08+5:30
नवरदेवाच्या मोठ्या भावाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची आरोग्य पथकाकडून तपासणी होणार असल्याने नवरदेवालाही आता क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.
नाशिक : हळदीचा कार्यक्रम आटोपता घेतला जातो अन् त्याचदरम्यान नवरदेवाच्या भावाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची वार्ता समजते. वऱ्हाडी मंडळी हळूहळू काढता पाय घेतात. बोटावर मोजण्याइतक्याच लोकांमध्ये नववधू-नवरदेव सात फेरे घेत विवाह बंधनात अडकतात; मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नववधूची ‘बिदाई’ सासरी होत नाही अन् नवरदेवालाही पर्यायाने क्वारंटाईन व्हावे लागते, ही घटना घडली आहे, नाशिकजवळील पळसे गावात.
निफाड तालुक्यातील शिलापूर गावाच्या एका युवकाचा विवाह नाशिकरोडजवळील पळसे येथील मुलीसोबत जमला. गुरूवारी (दि.२८) हा विवाह बोटावर मोजण्याइतक्याच लोकांमध्ये उरकून घेण्यात आला, कारण विवाहच्या पुर्वसंध्येलाच हळदीच्या कार्यक्रमादरम्यान नवरदेवाचा भाऊ कोरोनाबाधित असल्याचे अहवालानंतर समोर आले. यामुळे लग्नसोहळ्याला आलेल्या वऱ्हाडींच्या पायाखालची वाळू सरकली. हळद समारंभातून सगळ्यांनीच लागलीच काढता पाय घेणे पसंत केले. दुसऱ्या दिवशी पळसे गावात नववधू-नवरदेवच्या घराच्या मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ‘डिस्टन्स’ राखत विवाहचा विधी आटोपता घेतला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सप्तपदी झाल्यावर वधूला नवरदेवासोबत न पाठविण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबियांकडून घेतला गेला. आपल्या नववधूला सोबत न घेता रिकाम्या वाहनाने नवरदेव कुटुंबियांसह आपल्या घरी परतला. नवरदेवाच्या मोठ्या भावाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची आरोग्य पथकाकडून तपासणी होणार असल्याने नवरदेवालाही आता क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. या विवाहसोहळ्याची पंचक्रोशीत मात्र चर्चा रंगली होती.
विवाह जरी पार पडला असला तरी शासकीय यंत्रणा मात्र सतर्क झाली आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी पथक, पोलीस, महसूल अधिकारीवर्गाकडून प्रशासकीय पातळीवर माहिती घेतली जात आहे. पळसे गावाचे पोलीस पाटील सुनिल गायधनी यांनी सांगितले की, नवरदेवाच्या मोठ्या भावाच्या संपर्कात संपर्कात आलेल्या सर्वच लोकांची यादी बनविली जात आहे. प्रशासकीय पातळीवर काम सुरु आहे. सैय्यद प्रिंप्री येथील वैद्यकीय अधिकारी माधव आहिरे यांनी गुरूवारी सकाळी शिलापूर येथील करोना पॉझटिव्ह रु ग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वच लोकांची माहिती घेतल्याचे सांगितले.