शेटेंनंतर दोघे मातब्बर ‘रडार’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 11:30 PM2017-08-01T23:30:32+5:302017-08-02T00:10:01+5:30
मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविल्यानंतर विरोधकांचे पुढील टार्गेट माजी आमदार उत्तम भालेराव व दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील असल्याचे समोर आले आहे.
नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविल्यानंतर विरोधकांचे पुढील टार्गेट माजी आमदार उत्तम भालेराव व दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील असल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही मातब्बर नेते श्रीराम शेटे यांच्याप्रमाणेच अन्य ठिकाणी शिक्षण संस्थेत सभासद अथवा संचालक असल्याचे पुरावे विरोधकांच्या हाती लागल्याची चर्चा आहे.
दरम्यान, लवादाचा निर्णय मान्य करीत त्या विरोधात न्यायालयात न जाण्याचे जाहीर करणाºया श्रीराम शेटे यांनी लवादाचा निर्णय झाल्यानंतर २४ तास उलटत नाही तोच मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात धाव घेतली आहे. त्यांच्या समर्थकांनी याला दुजोरा दिला आहे, तर दुसरीकडे श्रीराम शेटे यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करणारे शिवसेनेचे सुरेश डोखळे यांनीही यापूर्वीच उच्च न्यायालयात श्रीराम शेटे यांच्या विरोधात कॅव्हेट दाखल केल्याने श्रीराम शेटेंसमोरील अडचणी वाढल्याची चर्चा आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेची निवडणूक यानिमित्ताने न्यायालयात पोहोचली आहे. श्रीराम शेटे यांनी उमेदवारी अर्जासोबत आपण कुठल्याही अन्य शिक्षण संस्थेचे सभासद नसल्याचे प्रतिज्ञापत्रावर दिलेले असताना ते कादवा साखर कारखान्याच्या रा. स. वाघ शिक्षण संस्थेचे पदसिद्ध संचालक असल्याची हरकत सुरेश डोखळे यांनी घेतली होती. त्यावर लवादाने श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविला होता. त्यामुळे प्रगती पॅनलला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसला होता. निवडणुकीत हे दोन्ही उमेदवार विजयी झाल्यास निवडणुकीनंतर त्यांना अपात्र ठरविण्यासाठी विरोधक खेळी करणार असल्याची चर्चा आहे.