ढकांबे येथील विवाहितेच्या आत्महत्येनंतर सासरच्यांना चोपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:52 AM2018-10-20T00:52:40+5:302018-10-20T00:53:23+5:30
चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या ढकांबे येथील नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़२८) घडली़ सोनाली गोकूळ बोडके, असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, सासरच्या छळास कंटाळूनच मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करून माहेरच्यांनी सासरच्यांना जिल्हा रुग्णालयात मारहाण केली़
नाशिक : चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या ढकांबे येथील नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़२८) घडली़ सोनाली गोकूळ बोडके, असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, सासरच्या छळास कंटाळूनच मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करून माहेरच्यांनी सासरच्यांना जिल्हा रुग्णालयात मारहाण केली़ याप्रकरणी सोनालीचा पती गोकुळ कैलास बोडके, सासू सुनीता बोडके, दीर अजित बोडके व आजेसासरे मनोहर बोडके (सर्व रा. ढकांबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथील सोनाली सोमनाथ लहाने (१९) हिचा दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे राहणाऱ्या गोकुळ बोडके याच्याशी ४ मे २०१८ रोजी नांदूर नाक्यावरील एका लॉन्समध्ये झाला होता. दरम्यान, लग्नाच्या वेळी संशयित बोडके कुटुंबाने सोनालीकडे दोन तोळे सोन्याची साखळी व अंगठीची मागणी केली; मात्र गरिबी असल्याने सोनालीच्या कुटुंबाने बोडके यांची इच्छा पूर्ण केली नाही. सोनालीचे लग्न तिचे मामा बाळू रंगनाथ धात्रक (रा. ढकांबे) यांनी स्वखर्चाने करून दिले, तर या लग्नात एकूण सहा लाख रुपयांचा खर्च केला. दरम्यान, लग्नानंतर सोनाली गोकुळ बोडके ही दोन दिवसांसाठी माहेरी परत आली. यानंतर तिने तिच्या आईला सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची कल्पना दिली, तर सोनालीचा पती गोकुळ कैलास बोडके, सासू सुनीता कैलास बोडके, दीर अजित कैलास बोडके व आजेसासरे मनोहर दामोदर बोडके यांनी सोनालीच्या अंगावरील सोन्याची मोहनमाळ, नेकलेस व कानातील दागिने काढून घेतले होते, तर तिचा मोबाइल फोनसुद्धा काढून घेतला होता, तर सोनालीच्या कुटुंबीयांनी तिला केव्हाही फोन केला असता तिचे सासरचे मोबाइलचा स्पीकर आॅन करून बोलण्यास सांगत होते, तर सासू सुनीता बोडके ही सोनालीला नेहमी कामकाजावरून मारहाण करीत होती.
संशय व्यक्त
सासरच्या या छळास कंटाळून सोनालीने ढकांबे येथे गळफास लावून घेत आत्महत्या केली. दरम्यान, सोनालीची आई लता लहाने यांनी सोनालीला दवाखान्यात आणणारे संशयित कांतीलाल मनोहर बोडके, नितीन संपत बोडके (दोघे रा. ढकांबे) व विजय धात्रक (रा. आशेवाडी, ता. दिंडोरी) यांच्यावरही संशय व्यक्त केला आहे़