नुतन खासदार वाजे, बच्छाव दिल्लीला, गोडसे यांचा प्रलंबीत कामांचा पाठपुरावा सुरू; रणधुमाळी थांबली, कामांना सुरूवात
By संजय पाठक | Published: June 8, 2024 06:34 PM2024-06-08T18:34:58+5:302024-06-08T18:36:05+5:30
नाशिक लाेकसभा मतदार संघातून शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव करून उध्दव सेनेचे राजाभाऊ वाजे निवडून आले.
नाशिक- लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राजकीय रणधुमाळी संपल्याने नाशिकचे नुतन खासदार राजाभाऊ वाजे आणि नाशिक निवासी धुळ्याच्या खासदार डॉ. शाेभा बच्छाव यांनी पक्षीय बैठका आणि नेांदणीसाठी दिल्ली गाठली आहे. दुसरीकडे पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांनी झाले गेले ते विसरून पुन्हा आपल्या कार्यास प्रारंभ केला आहे. उद्योजकांशी संपर्क साधून त्यांनी उद्योग मंत्र्यांकडे बैठक घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
नाशिक लाेकसभा मतदार संघातून शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव करून उध्दव सेनेचे राजाभाऊ वाजे निवडून आले. तर धुळ्यात भाजपाचे उमेदवार व माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा पराभव करून नाशिकच्या मध्ये राहणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव या निवडून आल्या. निकालानंतर वाजे नुतन खासदार म्हणून रजिस्ट्रेशनसह काही कामे करण्यासाठी ते दिल्लीस रवाना झाले तर डॉ. शोभा बच्छाव शनिवारी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या खासदारांच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी रवाना झाल्या.
या सर्व घडामोडीत हेमंत गोडसे यांनी आपल्या पराभवाचा विषय दुर सारून नियमीत संपर्क आणि कामे करण्यास प्रारंभ केला आहे. उद्योजकांशी संपर्क साधून त्यांनी राजूर बहुला येथील प्रस्तावित एमआयडीसीचे काम तसेच सीपेटच्या कामासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. जी कामे अंतिम टप्प्यात आणली ती मार्गी लावण्याचे काम सध्या करीत असल्याचे गोडसे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.