तीन महिन्यांनंतर सर्वच आगारांतून धावल्या बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 01:44 AM2022-02-03T01:44:31+5:302022-02-03T01:44:49+5:30
विलीनीकरणाच्या मुद्दयावरून एस. टी. कर्मचारी संपावर असल्याने राज्यासह नाशिकमधीलही प्रवासी वाहतूक ठप्प झाली असताना, तीन महिन्यांनंतर जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक रुळावर येऊ लागली आहे. बुधवारी नाशिक विभागातील सर्वच्या सर्व १३ आगारांमधून बसेस धावल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे दररोज बसेसची संख्या आणि चालक-वाहकही कामावर रूजू होत असल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
नााशिक : विलीनीकरणाच्या मुद्दयावरून एस. टी. कर्मचारी संपावर असल्याने राज्यासह नाशिकमधीलही प्रवासी वाहतूक ठप्प झाली असताना, तीन महिन्यांनंतर जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक रुळावर येऊ लागली आहे. बुधवारी नाशिक विभागातील सर्वच्या सर्व १३ आगारांमधून बसेस धावल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे दररोज बसेसची संख्या आणि चालक-वाहकही कामावर रूजू होत असल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
एस. टी. महामंडळ आणि कर्मचाऱ्यांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून विलिनीकरणावरून वाद सुरू असल्याने त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण १३ डेपो असून, या सर्व डेपोंमधील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याने काही दिवसांपूर्वी एकही डेपोतून बस धावत नसल्याची परिस्थिती होती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. कर्मचारी कामावर येत नसल्याचे पाहून महामंडळाने कंत्राटी चालकांची तात्पुरती नियुक्ती करून बसेस सुरू केल्या, तर संपातून काही चालक-वाहक रूजू होत असल्याने एस.टी. बसेस रुळावर येत आहे.
बुधवारी नाशिक जिल्ह्यातील १३ डेपोंमधून एकूण १८४ बसेसने ५७९ इतक्या फेऱ्या केल्या. प्रवाशांची संख्यादेखील वाढत असल्याने प्रतिसाद लाभत असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. इगतपुरी आगारातून आजूबाजूच्या खेड्यापाड्यातही बससेवा सुरू झाली असून, इतर आगारांमधील बसेसदेखील गावागावात जाणार आहेत. सध्या तालुका पातळीवर बसेस धावत आहेत. सिन्नर आगारामधून सातत्याने बसेसची संख्या वाढत आहे, येवला तसेच पिंपळगाव आगारातील बसेसची संख्यादेखील आजवर दहाच्या पुढेच राहिली आहे. त्यात आणखी वाढ होत आहे.
--इन्फो--
वेळापत्रक नसले, तरी प्रवासी कायम
सध्या सुरू असलेल्या बसेसचे कोणतेही वेळापत्रक लागू करणे शक्य नसल्याने प्रवाशांना स्थानकांमध्ये बसची वाट पाहावी लागत आहे. असे असले तरी, बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने महामंडळाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कामावर रूजू होणारे चालक-वाहकदेखील वाढत असल्याने बसेसची संख्या जसजशी वाढत जाईल, तशा बसेस जादा उपलब्ध होणार आहेत.
--इन्फो--
सध्या पुणे, धुळे, सूरत, वापी, जळगाव आणि कसारा या बसेसला प्रवासी असल्यामुळे या बसेससाठी प्रवाशांना फारशी प्रतीक्षा करावी लागत नसल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.
--इन्फो--
बुधवारी नाशिक आगारातील बसेस
आगार सुटलेल्या बसेस
नाशिक-१ ६६
पंचवटी ०९
मालेगाव ०९
मनमाड ०४
सटाणा १६
सिन्नर १५
नांदगाव ०२
इगतपुरी १२
लासलगाव १६
कळवण ०६
पेठ ०१
येवला १४
पिंपळगाव १४