‘तुफानातील दिवा’ विझल्यानंतर कुटुंबही ‘अंधारा’त!

By admin | Published: September 28, 2016 12:15 AM2016-09-28T00:15:00+5:302016-09-28T00:15:38+5:30

कैफियत लोकशाहीर वामनदादांच्या परिवाराची : समाजबांधव नोकरी करू देईना अन् परिस्थिती जेवू घालेना

After the 'tufanan diva' was extinguished, the family was in darkness. | ‘तुफानातील दिवा’ विझल्यानंतर कुटुंबही ‘अंधारा’त!

‘तुफानातील दिवा’ विझल्यानंतर कुटुंबही ‘अंधारा’त!

Next

संजय वाघ  नाशिक
आयुष्यभर आपल्या पहाडी आवाजाने वेदनामुक्तीचे गीत गाणाऱ्या आणि स्फूर्तिदायी कवनांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या चळवळीसाठी पोषक वातावरण निर्मिती करणाऱ्या लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या परिवारावरच आता उपासमारी आणि बेघर होण्याची वेळ आली आहे. कर्तृत्ववान पित्याचे प्रसिद्धीने वलयांकित नाव संबंधित कुटुंबासाठी वरदान ठरण्याचा अनुभव सर्वश्रुत असताना समाजातील चार-दोन लोकांच्या आडकाठीमुळे मात्र दादांची प्रतिष्ठा कर्डक कुटुंबासाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे.
सहजसोप्या शब्दात समाजातील आर्थिक विषमतेवर आसूड ओढणाऱ्या वामनदादांच्या निधनानंतर ७ जून २००५ रोजी दत्तक मुलगा रवींद्र कर्डक यांनी पत्नी ललिता, मुलगा वैभव व मुलगी कोमल यांच्यासह नाशिक सोडून राहाता तालुक्यातील चितळी ही सासूरवाडी गाठली. उदरनिर्वाहासाठी श्रीरामपूरला निलायम आणि राधिका लॉजवर सिक्युरिटी म्हणून साडेआठ वर्षे काम केले. दरम्यानच्या काळात दादांचा मुलगा असल्याचे कळल्यावर समाजाची काही मंडळी लॉजवर आली. तुम्ही वामनदादांचे चिरंजीव असूच शकत नाही असे म्हणून शंका उपस्थित केली. पुरावे दाखवल्यावर सिक्युरिटीचे काम करून तुम्ही तर दादांचे नाव खराब करीत आहात असा मुद्दा उपस्थित केल्याने तेथून रवींद्र कर्डक यांना कामावरून कमी करण्यात आले. उत्पन्नाचे साधनच हिरावले गेल्याने कर्डक परिवार ३१ डिसेंबर २०१४ रोजी नाशिकला परतला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आणि मुलीच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न ‘आ’वासून उभा होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी अंबड औद्योगिक वसाहतीत तीन ठिकाणी त्यांनी दोन वर्षे सिक्युरिटीचे काम केले. तेथेही पुन्हा दादांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न पुढे करून एकीकडे त्यांना रोजीरोटीस मुकविण्यात आले तर दुसरीकडे कुटुंबाला हातभार लावणारा त्यांचा मुलगा वैभव सिडकोतील मर्चंट बॅँकेत सिक्युरिटी म्हणून काम करीत होता, त्यावरही सहा महिन्यांनंतर अशाच पद्धतीने बेरोजगार होण्याची वेळ आली.
वारंवार येणाऱ्या या कटू अनुभवांमुळे कर्डक परिवार व्यथित झाला. ‘मोठ्या माणसाच्या उदरी जन्माला येणे हा गुन्हा आहे का? आम्हाला कामावरून कमी करण्यापेक्षा दादांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचणार नाही, असे काहीतरी काम अथवा उदरनिर्वाहासाठी एखादे साधन तरी उपलब्ध करून द्या’, असा प्रश्न रवींद्र्र कर्डक जेव्हा उपस्थित करतात तेव्हा तो रास्त वाटल्यावाचून राहत नाही.
आज वामनदादा हयात नसताना त्यांच्या कुटुंबीयांची झालेली दैना पाहून त्यांच्याच ओळी सहज ओठावर येतात...
पाणी वाढ गं, लयी नाही मागत
भर माझं इवलंसं गाडगं,
पाणी वाढ गं,
काळानं केलं काळ...
जातीचं विणलं जाळ
पाण्याच्या घोटासाठी
तळमळतंय माझं बाळ,
पाज आम्हाला पाणी...
वामनदादांना मंजूर झालेल्या सदनिकेचा ताबा मिळावा तसेच मुलांच्या नोकरीसाठी रवींद्र कर्डक यांनी रिपाइं नेते रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, औरंगाबादचे माजी पालकमंत्री गंगाधर गाडे, नगर येथील शिवाजीराव ढवळे यांचीही भेट घेऊन मदतीची मागणी केली, परंतु केवळ आश्वासनाव्यतिरिक्त त्यांच्या पदरी काहीच पडले नाही.

कर्डक पिता-पुत्र आज बेरोजगार असल्याने त्यांच्यावर उपासमारीची तर वेळ आलीच आहे शिवाय दोन महिन्याचे घरभाडे थकल्याने तेथूनही बेघर होण्याचे संकट त्यांच्या माथ्यावर घोंगावू लागले आहे. एकट्या ललिता कर्डक यांच्या धुणे-भांड्यातून मिळणाऱ्या अल्पशा पुंजीवर एका महाकवीचे कुटुंब किती दिवस तग धरणार आहे?

आमच्या घराचा ताबा कुठाय हो...
सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात वामनदादांना दोन लाख रुपयांची मदत आणि सदनिका देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शासनाने पुण्यातील तोतलानी भागातील मोनिका गार्डनमध्ये सदनिका दिली. परंतु ती न स्वीकारता दादांनी नाशिकमध्येच सदनिकेची मागणी केली होती. तीही मागणी मान्य करीत शासनाने नाशिकमधील अनुजा हौसिंग सोसायटीच्या तळ मजल्यावर सदनिका देण्याची तयारी दर्शविली. २५ मे २००४ रोजी सदनिकेचा ताबा मिळण्याआधीच दुर्दैवाने १५ मे २००४ रोजी दादांचे निधन झाले आणि सदनिकेचा विषय तेव्हापासून दुर्लक्षितच आहे. रवींद्र कर्डक यांनी २००४ पासून आजपर्यंत पाठपुरावा केला, मात्र सदनिकेचा ताबा काही केल्या मिळत नाही. ‘सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठाय हो, सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो’ असा सवाल गीतातून पुसणाऱ्या वामनदादांच्याच मुलावर आता ‘आमच्या घराचा ताबा कुठाय हो’ असे विचारण्याची वेळ आली आहे.

मी जरी महाकवीचा मुलगा असलो, तरी घरखर्च भागविण्यासाठी कोठेतरी मिळेल ते काम तर करावेच लागेल ना? समाज आणि दादांना मानणारे किती दिवस मदत करतील? आमच्याच समाजातील काही बांधव आर्थिक मदतीचे आणि सदनिकेसाठी सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईसाठी मदतीचे नुसते आश्वासन देतात. परंतु त्याची अंमलबजावणी मात्र कोणीच करीत नाही. पाच ठिकाणी नोकरी केली, त्या माझ्या सिक्युरिटीच्या नोकरीमुळे वामनदादांचे नाव खराब होते अशी सबब संबंधिताना सांगून आम्हाला नोकरीवरूनही हटविण्यात येते. मुलाच्या बाबतीतही तोच अनुभव आला. मग अशावेळी आम्ही जगायचे कसे?
- रवींद्र कर्डक,
स्वामी विवेकानंदनगर, राणेनगर, नाशिक





 

Web Title: After the 'tufanan diva' was extinguished, the family was in darkness.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.