सोनांबे येथे दोन तपानंतर माजी विद्यार्थ्यांची भरली पुन्हा शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 05:43 PM2019-03-28T17:43:32+5:302019-03-28T17:43:44+5:30
सोनांबे : सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथील मविप्रच्या जनता विद्यालयात १९९३ मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचा वयाच्या चाळिशीनंतर पुन्हा वर्ग भरला. याप्रसंगी ६५ माजी विद्यार्थी -विद्यार्थीनी उपस्थित होते. मेळाव्याला तत्कालीन शिक्षक व विद्यार्थिनींची उपस्थिती लक्षणीय होती.

भैरवनाथ मंदिरात विद्यार्थ्यांच्या वतीने हार आणि पूजन करून शाळेत कार्यक्रमाला सुरूवात झाली. कार्यक्रमात प्रत्येक व्यिार्थ्यांला संवाद साधण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपापले व्यवसाय, नोकरी, सध्याची परिस्थिती व शाळेत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर २६ वर्षानंतर भेटल्याचा आनंद ओसांडून वाहत होता. सुमारे सहा तास चाललेल्या या कार्यक्रमात सर्वजण तहानभूक विसरून सहभागी झाले होते. याप्रसंगी निवृत्त शिक्षक तसेच सेवेत असलेले शिक्षक यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विशेष स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे दोन विद्यार्थी नुकतेच भारतीय सेवेत निवड झाल्याबद्दल त्यांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. मोहन वारूंगसे यांनी प्रास्तविक केले. प्रकाश डावरे यांनी सूत्रसंचालन केले. नीलेश राव यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, कर्मचारी, निवृत्त शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी पवार व माजी विद्यार्थी- विद्यार्थीनी आदी उपस्थित होते.