इच्छुकांच्या माघारीनंतर निष्ठावंतांचे बंडखोरांना पाठबळ

By admin | Published: February 12, 2017 12:29 AM2017-02-12T00:29:12+5:302017-02-12T00:29:56+5:30

असंतोष : भाजपात अंतर्गत कलहाची पेटू लागली धग

After withdrawing the will, support the rebels of the loyalists | इच्छुकांच्या माघारीनंतर निष्ठावंतांचे बंडखोरांना पाठबळ

इच्छुकांच्या माघारीनंतर निष्ठावंतांचे बंडखोरांना पाठबळ

Next

नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांना शांत करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यात यशस्वी ठरलेल्या पदाधिकाऱ्यांना हायसे वाटत असले तरी प्रत्यक्षात या नाराज असलेल्यांना एकत्र करून त्यांच्यावर पुन्हा पक्षातील कामाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याने सदर निष्ठावंत नाराजांची संख्या वाढत असून, त्यांच्या मनातील धग ही मतदानानंतर निकालावरून स्पष्ट होईल.
निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्या अन्य पक्षांतील लोकांचा विचार अधिक केला गेल्याने ही नाराजी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे एका निष्ठावंतानेच बोलून दाखविले.
महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची कमी-अधिक प्रमाणात गर्दी होते. त्यातल्या त्यात केंद्रात, राज्यात भाजपाची सत्ता असल्याने भाजपाच्या यादीत हजारो इच्छुक होते. १२२ जागांकरिता त्यातून योग्य उमेदवार निवडण्याकरिता पक्ष पदाधिकाऱ्यांना अपार कष्ट घ्यावे लागले. हे करताना माझा- तुझा, मनी- मसलचाही विचार केला गेल्याने अनेकांना उमेदवारीकरिता डावलले गेले. हे सर्व नाराज बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याने अखेर काहींना साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून माघारीच्या अखेरच्या दिवशी माघार घ्यायला लावली.
मात्र त्यामुळे मला नाही तर तुलाही नाही, याप्रमाणे नाराजांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करणे सुरू केले, तर जे काही बंडखोरी करून निवडणूक रिंगणात राहिले त्यांना पाठबळ देण्याचा आता पक्षाच्या निष्ठावंतांनी विडा उचलला आहे. ही बाब पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटली नसल्याने त्यांनी पक्षातील ज्येष्ठ, श्रेष्ठ, जुन्या जाणकार आणि निष्ठावंतांसह उमेदवारी नाकारलेल्या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तरी पालकमंत्र्यांनी यासंदर्भात बैठकसुद्धा घेतली आणि या नाराज असलेल्यांना निवडणुकीचीच जबाबदारी सोपविण्याचे निश्चित केले. आता प्रभागात प्रचार सुरू असताना मतदानाच्या दिवशी बूथ रचना, पक्षातील नेत्यांच्या जाहीर सभा, मतदारांपर्यंत स्लिपा पोहोचविणे, विभागनिहाय मेळावे, प्रचार, प्रसार, प्रचार साहित्य वाटप अशा अनेक कामांची विभागणी करून त्या त्या समित्यांवर या नाराज असलेल्यांना नियुक्त करीत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र त्याला फारसे यश आले नसल्याचे सांगितले जाते.

Web Title: After withdrawing the will, support the rebels of the loyalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.