लेखी आश्वासनानंतर सायगावकरांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 11:51 PM2021-07-26T23:51:18+5:302021-07-26T23:59:35+5:30
येवला : तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराबाबत पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशी लेखी आश्वासनाने मागे घेण्यात आले.
येवला : तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराबाबत पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशी लेखी आश्वासनाने मागे घेण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्य यांच्या मासिक बैठकीत चर्चा झालेल्या विषयावर विरोधी सदस्यांनी आपेक्ष व हरकत घेतली असता, त्याची प्रोसेडिंगला नोंद घेण्यात यावी, २६ एप्रिल २०२१ रोजी झालेल्या मासिक बैठकीतील भावपत्रके (कोटेशन) मंजुरीचे आधिकर सरपंच यांना प्रदान करणेबाबतचा ठराव रद्द करण्यात येऊन पूर्वीप्रमाणे सदरचे कोटेशन हे मासिक बैठकीत मंजूर करावे, ढाकणे वस्ती व निघुट वस्ती येथील जलवाहिनी कामाची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ग्रामपंचायतने पंधराव्या वित्त आयोगातून पथदिव्यांचे बिल न भरणेबाबत ठराव मंजूर करावा, गावातील नादुरुस्त असलेले सौरदीप चालू करण्यात यावे, मासिक बैठक संपल्यानंतर प्रोसेडिंगची नक्कलप्रत सदस्यांना त्याच दिवशी देण्यात यावी, ग्रामपंचायत कार्यालयात थंब मशीन व सीसीटीव्ही तसेच गावात मुख्य ठिकाणीही सीसीटीव्ही बसविण्यात यावे आदी मागण्यांसाठी सोमवार, २६ पासून पंचायत समिती कार्यालय येथे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब अहिरे, अरविंद उशीर, योगिता निघुट यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते.
दरम्यान, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आंनद यादव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन, येत्या पंधरा दिवसांत सखोल चौकशी करण्याचे लेखी पत्र दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले. तर मागण्यांबाबत आश्वासनाप्रमाणे चौकशी होऊन अहवाल न मिळाल्यास येत्या १३ ऑगस्टपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला.