पुन्हा आरोग्य, पाण्यावरच चर्चा

By admin | Published: October 20, 2016 01:54 AM2016-10-20T01:54:02+5:302016-10-20T01:55:09+5:30

पूर्व प्रभाग : आरोग्य अधिकाऱ्याच्या बदलीचा ठराव

Again discuss health, water | पुन्हा आरोग्य, पाण्यावरच चर्चा

पुन्हा आरोग्य, पाण्यावरच चर्चा

Next

इंदिरानगर : नगरसेवकांकडून वारंवार तक्रारी करूनही पाणी आणि आरोग्य यांसारख्या प्राथमिक प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त करीत आरोग्य अधिकारी पी. डी. पाटील यांचा बदलीचा ठराव पूर्व प्रभाग समितीच्या बैठकीत केला. प्रत्येक बैठकीला आरोग्य आणि पाण्याच्या बाबतीत अनेक समस्या मांडल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून त्या सोडविण्याबाबत गांभीर्य दाखविले जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी यावेळी केला.
पूर्व प्रभाग सभा सभापती नीलिमा आमले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रभाग क्रमांक ४० मध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. कोणतेही कारण न देता पाण्याची वेळ बदलणे, कमी दाबाने पाणीपुरवठा करणे अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत विचारणा करूनही कोणतीही अडचण नसल्याचे सांगून तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब दीपाली कुलकर्णी यांनी निदर्शनास आणली. दिवाळीच्या काळात पाणीटंचाई निर्माण होणार असेल, तर त्यामुळे नागरिकांचा रोष नगरसेवकांवर येतो याला कोण जबाबदार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
त्याबरोबरच सिटी उद्यानाकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे उद्यान लयास गेले आहे. या कामाची जबाबदारी असणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. अशीच परिस्थिती जॉगिंग ट्रॅकचीदेखील झाल्याचे त्यांनी सांगितले. शौचालय स्वच्छतेचाही प्रश्न असल्याचे सांगून त्यांनी जोपर्यंत कामकाज होणार नाही तोपर्यंत सभागृह न सोडण्याची भूमिका त्यांनी घेतली. सर्वच नगरसेवकांनी कुलकर्णी यांच्या भूमिकेचे समर्थन केल्यानंतर दोन दिवसात कामकाज मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
जुने नाशिक परिसरात दिवसातून दोन वेळेला पाणीपुरवठा करण्याची मागणी नगरसेवक रंजना पवार यांनी केली. मोटार लावून पाणी खेचणाऱ्यांमुळे इतरांना पुरेसे पाणी मिळत नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणीही त्यांनी नोंदविली. याप्रसंगी सभेत प्रभागातील सुमारे ६० लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Again discuss health, water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.