स्मार्ट रोडमुळे पुन्हा कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:43 AM2019-11-25T00:43:44+5:302019-11-25T00:44:09+5:30
गेल्या दीड वर्षापासून स्मार्ट रोडच्या प्रलंबित असलेल्या कामामुळे परिसरातील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यात या रोडचे काम पूर्णत्वास येत नाही तोच अशोकस्तंभ येथील स्मार्ट रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आल्यामुळे येथील व्यावसायिकांना पुन्हा एकदा आर्थिळ झळ बसणार आहे.
नाशिक : गेल्या दीड वर्षापासून स्मार्ट रोडच्या प्रलंबित असलेल्या कामामुळे परिसरातील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यात या रोडचे काम पूर्णत्वास येत नाही तोच अशोकस्तंभ येथील स्मार्ट रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आल्यामुळे येथील व्यावसायिकांना पुन्हा एकदा आर्थिळ झळ बसणार आहे. त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
शहराला जोडणाऱ्या अशोकस्तंभ चौकात स्मार्ट रोड अंतर्गत कामासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे चहूबाजूंनी स्तंभाकडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात येत आहे. त्यामुळे रविवार कारंजा ते रेडक्र ॉस सिग्नलपर्यंत दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यात पर्यायी मार्गाबाबत माहिती नसल्याने अनेक वाहनधारकांची दिशाभूल होत आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.
गेल्या दीड वर्षापासून या रस्त्याचे काम रखडल्याने वाहनधारकांसह परिसरातील व्यावसायिक, रहिवासी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशी परिस्थिती असताना स्मार्ट रोडच्या पुढच्या टप्प्यातील कामासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेला अशोकस्तंभ परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी शुक्रवारपासून हा मार्ग ३ महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या परिसरात असलेले महाविद्यालय, शाळा, व्यावसायिक संकुलामुळे या ठिकाणांहून रोजच मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ सुरू असते.
व्यावसायिकांना आर्थिक फटका
अशोकस्तंभ शहराचा मध्यवर्ती परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे याठिकाणी अनेकांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. मात्र प्रशासनाने हा परिसर पुढील तीन महिने वाहतुकीसाठी बंद केल्याने येथील व्यवसाय संकटात सापडला आहे.
परिसरात हॉटेल्स, दुकाने, हॉस्पिटलची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र याठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कामामुळे परिसरातील विविध व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार असल्याचे अनेक व्यावसायिक सांगतात.
रस्ताच बंद असल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. त्यात याठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक न करता ठेकेदाराने नेमलेल्या ट्रॅफिक वार्डनवरच वाहतुकीची जबाबदारी देण्यात आल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.