एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी पुन्हा संपाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:12 AM2018-04-13T05:12:17+5:302018-04-13T05:12:17+5:30
महाराष्ट्रातील एसटी कामगारांना मिळणाऱ्या वेतनात त्यांच्या कुटुंबीयांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे एसटी कामगारांना १ मेपर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याचा निर्णय सरकारने जाहीर करावा
नाशिक : महाराष्ट्रातील एसटी कामगारांना मिळणाऱ्या वेतनात त्यांच्या कुटुंबीयांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे एसटी कामगारांना १ मेपर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याचा निर्णय सरकारने जाहीर करावा; अन्यथा इंटक संलग्न महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसच्या माध्यमातून मे महिन्यात पुन्हा राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला.
इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) संलग्न महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या नाशिक येथील ‘एल्गार’ मेळाव्यात गुरुवारी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष संजिवा रेड्डी, महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाने, आदी उपस्थित होते.
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली. त्यांनी एसटीमध्ये दिवाळखोरी सुरू केली असून, खासगीकरणाच्या माध्यमातून आणलेल्या शिवशाहीच्या करारातून कोट्यवधींच्या कमिशनसाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही छाजेड यांनी या वेळी केला.