प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावरच व्यवसाय थाटून अनोखे आंदोलन
By Admin | Published: January 23, 2015 02:05 AM2015-01-23T02:05:25+5:302015-01-23T02:05:45+5:30
प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावरच व्यवसाय थाटून अनोखे आंदोलन
सिडको : अनामत रक्कम भरूनही व्यवसायासाठी जागा दिली नसल्याने संतप्त चर्मकार समाजबांधवांनी आज चक्क सिडको प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावरच व्यवसाय थाटून अनोखे आंदोलन केले.
सिडको नागरिक संघर्ष समितीच्या वतीने गेल्या सोमवारपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणात आज चर्मकार समाजातील व्यावसायिकांनी सहभाग घेतला. सिडको प्रशासनाने सन २००० सालापासून चर्मकार समाजाकडून त्यांना व्यवसायाकरिता जागा देतो असे सांगत २५ व्यावसायिकांकडून प्रत्येक सुमारे पाच हजार रुपये अनामत रक्कम उकळली. परंतु अजूनही त्यांना जागा दिलेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या व्यावसायिकांनी आज चक्क सिडको प्रशासनाच्या विरोधात त्यांच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेत रस्त्यावरच व्यवसाय थाटला. गेल्या पंधरा वर्षांत सिडकोकडे पाठपुरावा करून जागा दिली नसल्याची खंत व्यक्त केली. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रशासनाकडे अनामत रक्कम भरूनही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)