अंगणवाडी बंदीच्या विरोधात न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:00 AM2018-06-13T01:00:31+5:302018-06-13T01:00:31+5:30
नाशिक महापालिकेने शहरातील २०९ अंगणवाडी कायमस्वरूपी बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात भारतीय हितरक्षक सभेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका एकवटल्या असून, महापालिकेच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे.
पंचवटी : नाशिक महापालिकेने शहरातील २०९ अंगणवाडी कायमस्वरूपी बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात भारतीय हितरक्षक सभेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका एकवटल्या असून, महापालिकेच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे. भारतीय हितरक्षक सभा या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची किरण मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. १२) पंडित पलुस्कर सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अंगणवाडी बंद करण्याच्या निर्णयाविरोधात सेविका व मदतनीस यांनी संताप व्यक्त करताना महापालिका अन्यायकारक पद्धतीने अंगणवाडी शाळा बंद करीत असल्याचा आरोप केला. तसेच २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्वरित सुरू करावे, मनपाच्या अन्यायाला लोकशाही पद्धतीने आंदोलन करून उत्तर देण्याचा निर्धार अंगणवाडी सेविकांनी केला असून, अंगणवाडी कर्मचाºयांची २१ सदस्यीय सेंट्रल अॅक्शन कमिटीही स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीच्या माध्यमातून महापालिकेविरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय या बैठकीत जाहीर करण्यात आला. यावेळी स्मिता साळवे, लता पवार, मंदा येलमामे, रश्मी गांगुर्डे, सूक्ष्मा खांबेकर, लीला शेवाळे आदी अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. दरम्यान, अंगणवाडी सेविकांच्या भूमिकेला आंस फाउण्डेशननेही पाठिंबा दर्शविला आहे.