आगासखिंडला टेम्पो, ट्रॅक्टर पेटवला नागरिकांमध्ये संताप : अज्ञात तिघांनी केले कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:54 PM2018-03-03T23:54:28+5:302018-03-03T23:54:28+5:30
सिन्नर : तालुक्यातील आगासखिंड शिवारात वस्तीवरील घरासमोर लावलेला टेम्पो व ट्रॅक्टर अज्ञात तिघांनी पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
सिन्नर : तालुक्यातील आगासखिंड शिवारात वस्तीवरील घरासमोर लावलेला टेम्पो व ट्रॅक्टर अज्ञात तिघांनी पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. सदर घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. सिन्नर तालुक्यातील औंढेवाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या अलका भीमा कुंदे (४०) या महिला शेतकरी सध्या आगासखिंड शिवारात राहून कुटुंबासमवेत शेती करतात. दिवसभर काम करून शुक्रवारी रात्री कुंदे कुटुंबीय वस्तीवर घरात झोपले होते. रात्री १ वाजेच्या सुमारास आवाज आल्याने त्यांना जाग आली. बाहेर येऊन पाहिल्यानंतर त्यांच्या मालकीचा ४०७ टेम्पो (क्र. एमएच १६ बी ४४६७) व ट्रॅक्टर (क्र. एमएच १५ ईएस ०८३७) पेटलेला होता. कुंदे कुटुंबीयांनी तातडीने जवळच्या तळ्यातून पाणी आणून आग विझविली. मात्र यात टेम्पो व ट्रॅक्टरचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. टेम्पो व ट्रॅक्टरला कोणी व का आग लागवी याचे कारण समजू शकले नाही. अलका कुंदे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी अधिक तपास करीत आहेत.