कारखान्यात उसळला आगडोंब; लाखोंचा माल बेचिराख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 01:51 AM2022-02-03T01:51:00+5:302022-02-03T01:51:18+5:30
औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्याला बुधवारी (दि. २) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. निलराज इंडस्ट्रीज नावाच्या कारखान्यात सुमारे पाच तास आगीचे तांडव सुरू होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे सहा बंबांच्या साहाय्याने पाच तास शर्तीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. या आगीत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांचा माल जळून बेचिराख झाला.
सातपूर : औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्याला बुधवारी (दि. २) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. निलराज इंडस्ट्रीज नावाच्या कारखान्यात सुमारे पाच तास आगीचे तांडव सुरू होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे सहा बंबांच्या साहाय्याने पाच तास शर्तीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. या आगीत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांचा माल जळून बेचिराख झाला.
औद्योगिक वसाहतीतील शीतल संघवी यांच्या मालकीच्या (प्लॉट क्रमांक-३४ ए) निलराज इंडस्ट्रीज या कारखान्याच्या तिसऱ्या मजल्यावर बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास आगीचा भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन उपकेंद्राचा बंब घटनास्थळी रवाना झाला. जवानांनी आपत्कालीन कार्य सुरू केले. मात्र, आगीने रुद्रावतार धारण केला होता. तसेच जळणारा माल हा प्लास्टिकचा असल्याने अतिरिक्त वाढीव मदत मागविण्यात आली. तत्काळ सातपूर येथील दोन बंब, सिडको उपकेंद्र, अंबड एमआयडीसी केंद्राचा प्रत्येकी एक बंब, महिंद्र अँड महिंद्र कंपनीचा एक बंब अशा सहा बंबांसह जवान घटनास्थळी दाखल झाले. सकाळी आठ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यास जवानांना यश आले. घटनास्थळावरील जळालेला मालावर पाणी मारून थंडावा करण्यासाठी या बंबांना सुमारे २०पेक्षा अधिक फेऱ्या माराव्या लागल्या. सकाली दहा वाजेपर्यंत जवानांकडून आपत्कालीन कार्य केले जात होते.
या आगीत तिसरा मजला पूर्णपणे जळून बेचिराख झाला. आगीचे निश्चित कारण समजू शकलेले नाही; मात्र शॉर्टसर्किट होऊन आग भडकली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.
--इन्फो--
५० लाखांचे आर्थिक नुकसान
कारखान्यात कॅपॅसीटरचे उत्पादन घेतले जाते. या आगीत कॅपॅसीटर, कॅपॅसीटरला लागणारा कच्चा माल, अल्युमिनियमचे आवरण, प्लास्टिकचे पॅकिंग मटेरियल, मशिनरी, तयार झालेला उत्पादित माल जळून राख झाल्याचे कारखाना मालकांनी सांगितले. या दुर्घटनेत सुमारे ५० लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज प्रथमदर्शनी वर्तविण्यात येत आहे.
---इन्फो--
सहा महिन्यांत दुसरी घटना
निलराज कंपनीत सहा महिन्यांपूर्वीसुद्धा पहाटेच्या सुमारास अशाचप्रकारे आगीची घटना घडली होती. त्यावेळी सातपूर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणली होती. बुधवारीदेखील पहाटेच्या सुमारास आग लागली. हा निव्वळ योगायोग असला तरी या कंपनीत अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे बोलले जात आहे.