विज्ञानयुगात बैलगाडी उरली केवळ नावापुरती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 11:07 PM2020-12-04T23:07:18+5:302020-12-05T00:20:57+5:30
आधुनिक युगामध्ये जुन्या जमान्यातील विविध वाहने आता कालबाह्य होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांचे दळणवळणासाठी महत्त्वाचे साधन म्हणून ओळखली जाणारी बैलगाडी आता केवळ नावापुरती उरली असून, खेडीही हायटेक होत असल्याचे हे लक्षण मानले जात आहे.
जळगाव नेऊर : आधुनिक युगामध्ये जुन्या जमान्यातील विविध वाहने आता कालबाह्य होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांचे दळणवळणासाठी महत्त्वाचे साधन म्हणून ओळखली जाणारी बैलगाडी आता केवळ नावापुरती उरली असून, खेडीही हायटेक होत असल्याचे हे लक्षण मानले जात आहे.
गरिबांचे वाहन अशी ओळख असलेल्या बैलगाडीचे दर्शन एकविसाव्या शतकामध्ये दुर्मीळ होत चालले आहे. पर्यावरणाला पूरक आणि पोषक तसेच सुरक्षित प्रवासाचे माध्यम असलेल्या बैलगाडीचे दर्शन आता दुर्मीळ होत चालले आहे. एक काळ असा होता की, प्रत्येक छोट्या-मोठ्या शेतकऱ्याच्या दाराशी सर्जा-राजाची खिल्लारी जोडी आणि बैलगाडी हमखास असायची. बैलगाडीद्वारे शेतापर्यंतचा तसेच काही कामानिमित्त लांबचा प्रवास अतिशय आल्हाददायक वाटायचा. घोड्याच्या पायाच्या आवाजासारखा टाप टाप येणारा बैलांचा आवाज, हलत डुलत चालणारी ती बैलगाडीची दोन चाके, शरीराच्या प्रत्येक अवयवाचा उत्तमरीत्या व्यायाम करून घेत होती. फार पूर्वी वाहतुकीची व्यवस्था नव्हती त्यावेळी बैलगाडी असणे श्रीमंतपणाचे लक्षण मानले जात होते. डोंगर माळरानात दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या अनेक गावातील लग्न वऱ्हाड बैलगाडीतून नवरीला सजवून लग्नाच्या ठिकाणी यायचे. तसेच वऱ्हाडी मंडळीदेखील बैलगाडीतून त्याठिकाणी जात होते. आता विज्ञान आणि आधुनिकीकरणाच्या गजबजाटात बैलगाडी लुप्त झाल्याचे दिसून येत आहे.