सोेमवारी निघणार सभेचा अजेंडा?
By admin | Published: May 24, 2015 01:24 AM2015-05-24T01:24:45+5:302015-05-24T01:27:35+5:30
सोेमवारी निघणार सभेचा अजेंडा?
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अजेंडा (विषयपत्रिका) येत्या सोमवारी (दि.२५) निघण्याची शक्यता असून, विषयपत्रिका निघाल्यापासून कमीत कमी दहा दिवसांत व जास्तीत जास्त १५ दिवसांत सभा घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे कदाचित अध्यक्षपदाची निवडणूक ५ जूनला होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, निवडणुकीनंतर देवाला घातलेले साकडे पूर्ण करण्यासाठी काही संचालकांनी देवदर्शनासाठी नाशिक सोडल्याचे समजते. शिवसेनेचे दोन्ही नवनिर्वाचित संचालक काल (दि.२३) मुंबईला कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, उद्धव ठाकरे मुंबईबाहेर असल्याने आमदार अनिल कदम व सुहास कांदे यांची कार्यकारी प्रमुखांची भेट होऊ शकली नाही. दिंडोरी तालुक्यातून बिनविरोध निवडून आलेले संचालक गणपतराव पाटील हे शुक्रवारीच जेजुरीला देवदर्शनासाठी रवाना झाले. उद्या रविवारी (दि.२४) इगतपुरी तालुक्यातून बिनविरोध निवडून आलेले संचालक व जिल्हा परिषद सदस्य अॅड. संदीप गुळवे हे तुळजापूर येथे देवीच्या दर्शनाला रवाना होणार आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनी व नेते मंडळींनी घेतलेले परिश्रम दूर करण्यासाठी देवळा तालुक्यातून बिनविरोध निवडून आलेले संचालक केदा अहेर जिल्'ालगतच असलेल्या गुजरातमधील पर्यटनस्थळी गेल्याचे समजते. काही संचालकांनी काल (दि.२३) सायंकाळी नाशिकला हजेरी लावून हिरे गटाशी चर्चा केल्याचे समजते. तर कोकाटे-पिंगळे गटाकडून माजी आमदार दिलीप बनकर बिनविरोध निवडून आलेल्या अपक्ष संचालकांची मनधरणी करीत असल्याचे कळते. मात्र जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपद हे बॅँकेतील इमारतीच्या पायऱ्या चढता चढता ठरत असल्याचा अनुभव पाहता अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार हे नक्की. त्यामुळे सोमवारी बैठकीची विषयपत्रिका निघाल्यानंतर दोेन्ही गटाकडून संचालकांची पळवापळवी व सहलीचे आयोजन करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.(प्रतिनिधी) इन्फो.. दोघा-दोघांचे दबाव गट जिल्हा बॅँकेत अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसताच दोेघा-दोेघांनी व तिघांनी दबाव गट करून एकत्र राहण्याची खेळी सुरू केल्याचे समजते. जिल्हा परिषद सदस्य असलेले संदीप गुळवे व सभापती केदा अहेर हे दोन्ही एकाच विचाराने निर्णय घेणार असल्याचे समजते. तिकडे शिवसेनेचे निवडून आलेले आमदार अनिल कदम व सुहास कांदे एकत्र असून ते कोणत्या पॅनलकडे जायचे, याचा एकमताने निर्णय घेणार आहेत.