आंदोलन आक्रमक : मुख्यमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:16 AM2018-07-25T01:16:51+5:302018-07-25T01:17:12+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, मराठा क्रांती मोर्चाने पंढपूरमध्ये विठ्ठलाची पूजा करण्यापासून रोखल्यानंतर त्यांनी मराठा समाजाविषयी अपशब्द वापरले. तसेच मराठा समाजाला आरक्षण देणे आपल्या हातात नसल्याचे सांगत त्यांनी काकासाहेब शिंदे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, मराठा क्रांती मोर्चाने पंढपूरमध्ये विठ्ठलाची पूजा करण्यापासून रोखल्यानंतर त्यांनी मराठा समाजाविषयी अपशब्द वापरले. तसेच मराठा समाजाला आरक्षण देणे आपल्या हातात नसल्याचे सांगत त्यांनी काकासाहेब शिंदे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. या मागणीसोबतच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (दि.२४) मुंबई-आग्रा महामार्गावर दुपारी २ वाजेच्या सुमारास रास्ता रोको करून मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. मराठा क्रांती मोर्चातर्फे वरदलक्ष्मी मंगल कार्यालयात नाशिक जिल्हा बंद आंदोलनाची नियोजन बैठक झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी नांदूरनाकामार्गे मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल जत्रापर्यंत मोर्चा काढून तेथील चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे...’आदी घोषणा करतानाच राज्य व क्रेंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच शेतकरी आंदोलनातील व दूधदराच्या आंदोलनात सहभागी तरुणांवर सराकारने खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.
स्कूलबस, रुग्णवाहिकांना मार्ग
मराठा आंदोलक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेले असतानाही मराठा क्रांती मूक मोर्चात समाजाने आंदोलनात दाखवून दिलेला आदर्श मंगळवारच्या आंदोलनातही दिसून आला. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी स्कूलबस, रुग्णवाहिकांना तत्काळ मोकळी वाट करून दिली.