पावसाळी गटारप्रश्नी विरोधक आक्रमक
By admin | Published: June 20, 2017 01:15 AM2017-06-20T01:15:47+5:302017-06-20T01:16:07+5:30
महापालिका : सभागृहनेत्याच्या आरोपानंतर महासभा गुंडाळली
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात गेल्या बुधवारी (दि.१४) झालेल्या अतिवृष्टीनंतर पावसाळी गटार योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर महापालिकेच्या महासभेत वादळी चर्चा झडली. विरोधक आक्रमक झाले असतानाच सत्ताधाऱ्यांकडूनही योजनेच्या फेरचौकशीची मागणी झाली. परंतु,
सभागृहनेते दिनकर पाटील यांनी सन २०१०-११ मध्ये झालेल्या महासभांचे इतिवृत्त बाहेर काढत तत्कालीन सत्ताधारी व विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांवर
आरोप केल्याने विरोधकांनी पीठासन अधिकाऱ्यांपुढे हौद्यात येऊन प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळातच महापौरांनी महासभा गुंडाळली. त्यामुळे,
पावसाळी गटारप्रश्नी तड लागू शकली नाही.मागील सप्ताहात १४ जूनला शहरात दीड तासातच ९२ मि.मी. पावसाची नोंद होऊन शहर जलमय झाल्याने पावसाळी गटार योजनेसह प्रशासनाच्या पावसाळापूर्व कामांविषयी प्रश्न उपस्थित करणारी लक्षवेधी पश्चिम प्रभाग समितीच्या सभापती डॉ. हेमलता पाटील यांच्यासह विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार यांनी महासभेत मांडली.
महासभेचे कामकाज सुरू होत असतानाच विरोधकांनी आधी लक्षवेधीवर चर्चा करण्याचा आग्रह धरला. परंतु, महापौरांनी आधी विषयपत्रिका, नंतर लक्षवेधी अशी भूमिका घेतल्याने विरोधकांनी हौद्यात दाखल होत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अखेर, महापौरांनी विरोधकांचा पवित्रा बघून लक्षवेधीवर चर्चा करण्यास मान्यता दिली. सुमारे चार तास पावसाळीपूर्व कामांसह पावसाळी गटार योजनेवर महासभेत वादळी चर्चा झडली. नगरसेवकांनी आपापल्या भागातील पावसाळी गटारीसह नैसर्गिक नाल्यांच्या परिस्थितीकडेही सभागृहाचे लक्ष वेधले. सभागृहात पावसाळी गटारप्रश्नी व्यवस्थित चर्चा होत असतानाच सभागृहनेता दिनकर पाटील यांनी पावसाळी गटार योजनेच्याबाबत यापूर्वी झालेल्या महासभांमधील इतिवृत्तसोबत आणत तत्कालीन सत्ताधारी पदाधिकारी व विरोधक यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात खेचले. पाटील यांनी सांगितले, सन २००८ मध्ये तत्कालीन महापौर विनायक पांडे यांच्या कारकीर्दीत पावसाळी गटार योजनेला मंजुरी मिळाली. त्यानंतर या योजनेतील कामात झालेल्या अनियमिततेबद्दल चौकशी समिती नियुक्त होऊन तत्कालीन अधीक्षक अभियंता सुनील खुने यांना निलंबित करण्यात आले होते. सन २००८ मध्ये पावसाळी गटार योजनेबद्दल लक्षवेधी देणाऱ्यांनी नंतर सुनील खुने यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत केलेली भाषणे तपासून पाहावी, असे सांगत पाटील यांनी अजय बोरस्ते, तत्कालीन सभागृहनेता सुधाकर बडगुजर, तत्कालीन विरोधी पक्षनेता डॉ. हेमलता पाटील यांचा नामोल्लेख केला. त्यात पाटील यांनी सत्ताधारी भाजपाचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांचेही नाव घेतले. पाटील यांनी थेट नाव घेऊन आरोप केल्याने डॉ. हेमलता पाटील, सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते यांच्यासह विरोधक आक्रमक झाले आणि पाटील यांच्या आरोपांवर खुलासा करू देण्याची मागणी महापौरांकडे केली.
परंतु, सभागृहनेत्यानंतर कुणी बोलायचे नाही, असा नियम असल्याचे सांगत महापौरांनी विरोधकांना बोलण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे विरोधक आणखीणच आक्रमक झाले आणि त्यांनी पीठासनापुढे हौद्यात येत सभागृहनेत्यासह सत्ताधारी पक्षाविरोधी निषेधाच्या घोषणा दिल्या. या गोंधळातच महापौरांनी विषय पत्रिकेची चर्चा न करताच सर्व विषयांना मंजुरी देत सभा गुंडाळली.