शेतकरी कायद्यांविरोधात पुन्हा आक्रमक जनजागृती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:20 AM2021-08-28T04:20:07+5:302021-08-28T04:20:07+5:30
नाशिक : केंद्र शासनाने केलेल्या ३ शेतकरीविरोधी कायद्यांच्या विरोधात नाशिक जिल्हा शेतकरी संघटना समन्वय समितीच्या वतीने आक्रमक ...
नाशिक : केंद्र शासनाने केलेल्या ३ शेतकरीविरोधी कायद्यांच्या विरोधात नाशिक जिल्हा शेतकरी संघटना समन्वय समितीच्या वतीने आक्रमक पद्धतीने जनजागृती करण्याच्या उद्देशाने रविवारी (दि. २९) नाशिकरोडच्या सिन्नर फाटा परिसरात जनजागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या परिषदेत बहुजन शेतकरी संघटना, किसान सभा, अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय समता परिषद, राष्ट्र सेवा दल, किसान कँग्रेस, राष्ट्रवादी किसान सेल, आम आदमी किसान सेल, शेतकरी सेना अशा शेतकरी संघटना प्रयत्नशील असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. या पत्रकार परिषदप्रसंगी माजी आमदार जे.पी. गावीत, दत्ता गायकवाड, देवीदास पिंगळे, राजू देसले, शरद आहेर, रमेश औटे, अशोक खालकर, तानाजी जायभावे, निवृत्ती अरिंगळे, संजीव तुपसाखरे, जगदीश पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. २९ऑगस्टला दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व भागांमधून शेतकरी सिन्नर फाट्यावरील कृऊबात पोहोचणार आहेत. या जनजागृती परिषदेस पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य मान्यवरदेखील उपस्थित राहणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.