परिचारिकांच्या मागण्यांवर तोडग्याची तयारी दर्शवल्याने आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:13 AM2021-04-17T04:13:23+5:302021-04-17T04:13:23+5:30

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील नर्सेस आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदे भरली नाहीत, तसेच अपुरा स्टाफ असल्याने कामाचा ताण वाढत ...

The agitation was postponed as they showed readiness to settle the demands of the nurses | परिचारिकांच्या मागण्यांवर तोडग्याची तयारी दर्शवल्याने आंदोलन स्थगित

परिचारिकांच्या मागण्यांवर तोडग्याची तयारी दर्शवल्याने आंदोलन स्थगित

googlenewsNext

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील नर्सेस आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदे भरली नाहीत, तसेच अपुरा स्टाफ असल्याने कामाचा ताण वाढत असल्याने अनेक नर्सेस बाधित होत असल्याच्या नर्सिंग स्टाफच्या तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात यांच्यासमवेत नर्सेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सकांनी नर्सिंग स्टाफची ३६ पदे येत्या आठवडाभरात भरण्याचे आश्वासन दिल्याने नर्स संघटनेचे प्रस्तावित आंदोलन टळले.

जिल्हा रुग्णालयात सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात, नोडल ऑफिसर डॉ. अनंत पवार तसेच जिल्हा नर्स संघटनेच्या अध्यक्ष पूजा पवार आणि अन्य पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक झाली. या बैठकीत नर्स संघटनेच्या मागण्या जिल्हा शल्य चिकित्सकांसमोर मांडण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यातील ३६ नर्सिंग स्टाफची पदे येत्या सात दिवसांत भरण्याबाबत तसेच आरआरएचचा स्टाफ नियुक्ती तत्त्वावर उपलब्ध करण्याची मागणी मान्य करण्यात आली. तसेच वर्ग-४च्या कर्मचाऱ्यांचीदेखील लवकरच भरती करणार; त्याशिवाय प्रत्येक वॉर्डमध्ये किमान दोन जण ड्युटीवर उपलब्ध राहावेत, अशा प्रकारचे नियोजन करण्याचेही या वेळी मान्य करण्यात आले. चांगल्या दर्जाचे पीपीई किट आणि ग्लोव्हज् लवकर उपलब्ध करून देण्यासाठी काही कंपन्यांशी बोलणी झाली असल्याने तेदेखील लवकरच मिळणार असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले. त्याशिवाय ओपीडी इमारतीमध्ये नर्सिंग स्टाफ आणि त्यांचे नातेवाईक यांच्या आरटीपीसीआर टेस्टिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. तसेच बाधित येणाऱ्या स्टाफला प्रामुख्याने उपचाराची व्यवस्था सुरू करण्यात येईल. त्यासाठी सकारात्मक बोलणे झाल्यानेदेखील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्याशिवाय अन्य मागण्यांसाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून, आश्वासनांबाबत लवकरच अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिल्याने शनिवारचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. या वेळी संघटनेच्या वतीने अध्यक्ष पूजा पवार यांच्यासह सचिव कल्पना पवार, सीमा टाकळकर, शुभांगी वाघ, कल्पना धनवठे, सोनल मोरे, अधिसेविका शमा माहुलीकर यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते.

Web Title: The agitation was postponed as they showed readiness to settle the demands of the nurses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.