कोरोना कंटेन्मेंट झोनमुळे शेतमालाचे लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 09:29 PM2020-05-12T21:29:43+5:302020-05-12T23:24:43+5:30

लासलगाव : लासलगाव आणि विंचूर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने संबंधित रुग्णाच्या निवास परिसरातील ३ कि.मी. परिघाचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

Agricultural auctions closed due to Corona Containment Zone | कोरोना कंटेन्मेंट झोनमुळे शेतमालाचे लिलाव बंद

कोरोना कंटेन्मेंट झोनमुळे शेतमालाचे लिलाव बंद

Next

लासलगाव : लासलगाव आणि विंचूर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने संबंधित रुग्णाच्या निवास परिसरातील ३ कि.मी. परिघाचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या ७ मेपासून लासलगाव व विंचूर येथील बाजार समिती आवारातील शेतमालाचे लिलाव बंद ठेवण्यात आले आहे. सदर कंटेन्मेंट झोनची मर्यादा कमी करून शेतमालाचे लिलाव पूर्ववत सुरू करण्याची मागणी लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी निफाडच्या प्रांत अर्चना पठारे व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
विंचूर येथील कोरोनाबाधित चार रुग्णांमुळे व लासलगाव येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने उपविभागीय दंडाधिकारी यांनी सदर रुग्णांच्या निवासापासूनचे ३ किमी परिघाचे क्षेत्र ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे बाजार समितीचे लासलगाव मुख्य बाजार आवार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिणामी ७ मेपासून लासलगाव मुख्य बाजार आवारातील सर्व शेतीमालाचे लिलाव बंद आहेत. लासलगाव बाजार समिती आवारातील कांदा, भुसार, तेलबिया, टोमॅटो, डाळिंब, द्राक्षेमणी व भाजीपाला या शेतीमालाच्या खरेदी-विक्रीसाठी शंभर मीटर व विंचूर उपआवारावर बंद असलेले लिलावाचे कामकाज सुरू होण्यासाठी तीनशे मीटर कंटेन्मेंट झोनची मर्यादा करावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
लॉकडाउनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून लासलगाव येथील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर व्यावसायिकांची अनेक छोटी-मोठी दुकाने बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यातच लासलगांवचे क्षेत्रफळ कमी असल्याने दरवेळी आढळून येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे रहिवाशी पत्त्यापासून पाचशे मीटरच्या परिघाचे क्षेत्र हे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित होत आहे. त्यामुळे दैनंदिन लिलावाचे कामकाजास अडचण येत आहे.
केंद्र शासनाची नोडल एजन्सी असलेल्या नाफेडला ‘किंमत स्थिरीकरण निधी’ अंतर्गत कांदा
खरेदी करून साठवणूक करण्यासाठी बाजार समितीतील लिलावाचे कामकाज सुरू राहणेकरिता लासलगाव येथील पाचशे मीटर अंतराची मर्यादा कमी करून ती शंभर मीटरपर्यंत करणेबाबत व मौजे विंचूर येथील ३ किमी अंतराची मर्यादा कमी करून ती तीनशे मीटरपर्यंत करावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
---------------------------
लिलाव व प्रकियेत विभाजन
लासलगावचे क्षेत्रफळ कमी असल्याने व लासलगाव येथे बाजार समितीचे दोन बाजार आवार असल्याने जुने बाजार आवार हे सुधारित आदेशाप्रमाणे पाचशे मीटरच्या कंटेन्मेंट झोनमध्ये येत आहे. बाजार समितीच्या जुन्या बाजार आवारात सध्या भुसार व तेलबिया शेतमालासह भाजीपाला शेतमालाचे लिलाव होत आहे.

Web Title: Agricultural auctions closed due to Corona Containment Zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक