निफाडच्या दहा गावांची शेतमाल वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 08:52 PM2020-12-25T20:52:49+5:302020-12-26T00:38:37+5:30
कसबे सुकेणे : कोरोनामुळे तब्बल आठ आणि एचएएलमुळे एक महिना बंद असलेली सीबीएस ते कसबे सुकेणे ही शहर बससेवा गुरुवारपासून पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान कृषिमाल आणि इतर प्रवासी वाहतुकीस परवानगी नसल्याने नागरिक व शेतकरी त्रस्त झाले आहेत.
कोरोनामुळे सीबीएस ते कसबे सुकेणे ही बससेवा बंद होती; परंतु अनलॉक झाल्यानंतर ही बससेवा सुरू होणार होती; मात्र एचएएलने त्यांच्या हद्दीतून सुकेणेकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहतुकीची नाकेबंदी केल्याने शहर बस बंद होती. नागरिकांच्या मागणीनुसार एचएएलने केवळ शहर बससेवेला परवानगी दिली. त्यामुळे गुरुवारपासून वेळापत्रकानुसार सीबीएस ते सुकेणे ही सेवा पूर्ववत सुरू झाली. दरम्यान एचएएलने शेतमाल व इतर प्रवासी वाहनांसाठी मरीमाता गेट ते महामार्ग हा जुना रस्ता खुला करावा, अशी मागणी जोर धरत आहे. ओझर शहरात सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. अरुंद गल्लीतून सध्या दुचाकीस्वार सुकेणेकडून ओझरमार्गे नाशिकला जात आहेत. त्यामुळे ओझर शहरातील वाहतूक ठप्प होत असून, सुकेणेकडील वाहतूक ओझर शहरातून अन्य मार्गाने वळवावी, अपघात झाले तर जबाबदार कोण, असा सवाल ओझरकर करत आहे.