आहेरगावच्या जवानाचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 12:49 AM2020-11-11T00:49:50+5:302020-11-11T00:53:10+5:30
निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील सुदर्शन दत्तात्रय देशमुख (वय 32) या जवानाचा पंजाबच्या पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे निफाड तालुक्यात शोककळा पसरली आहे. सुदर्शन यांचे पार्थिव बुधवारी (दि. 11) आहेरगावी येण्याची शक्यता आहे.
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील सुदर्शन दत्तात्रय देशमुख (वय 32) या जवानाचा पंजाबच्या पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे निफाड तालुक्यात शोककळा पसरली आहे. सुदर्शन यांचे पार्थिव बुधवारी (दि. 11) आहेरगावी येण्याची शक्यता आहे.
आहेरगाव येथील सुदर्शन दत्तात्रय देशमुख यांची पठाणकोट येथे नियुक्ती होती. सोमवारी (दि. 9) मध्यरात्रीच्या सुमारास सुदर्शन यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली. सुदर्शन यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. पिहली ते सातवीचे शिक्षण आहेरगाव येथील प्राथमिक विद्यामंदिर येथे, आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पिंपळगाव हायस्कूल, तर अकरावी ते बारावीचे शिक्षण पिंपळगावच्या क. का. वाघ महाविद्यालयात झाले आहे. 2009-10 साली सैन्यदलात भरती झाले. पुणे येथे प्रशिक्षण झाल्यानंतर सन 2012 साली लेह-लडाख येथे त्यांची पिहल्यांदा नियुक्ती झाली. 2018पासून पठाणकोट येथे सुदर्शन कर्तव्यावर होते. त्यांच्या कुटुंबात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.लहानपणापासूनच सैन्यदलात जाण्याचे सुदर्शन यांचे स्वप्न होते. उरी बाळगलेल्या ध्येयाची स्वप्नपूर्ती झाली. त्यांचा गावालाही अभिमान होता. चुलत भाऊ योगेश दीपक देशमुख यानेही सुदर्शनचा आदर्श समोर ठेवून सैन्यदलात जाण्याचे स्वप्न बाळगले. 2014-15 साली भरती झालेले योगेश आता कुपवाडा येथे कर्तव्य बजावत आहे.
तो फोन ठरला अखेरचा
सुदर्शन यांनी सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास आहेरगावी येथे फोन करीत कुटुंबाची विचारपूस केली. चांदवड येथे घर घेण्यासाठी जागा घेण्याची इच्छा सुदर्शन याने व्यक्त केली. जागा बघण्यासाठी वडील दत्तात्रय मंगळवारी चांदवड येथे जाणार होते. मोठ्या भावासाठी दुकान टाकणार असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मात्र, दुर्दैवाने चार तासांनंतरच मध्यरात्री सुदर्शन यांच्या मृत्यूची बातमी येताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.