महिला बालकल्याण समिती सभापतिपदी अहिरे बिनविरोध
By admin | Published: May 16, 2017 12:48 AM2017-05-16T00:48:36+5:302017-05-16T00:48:48+5:30
नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी भाजपाच्या सरोज अहिरे व उपसभापतिपदी भाजपाच्याच कावेरी घुगे यांची बिनविरोध निवड झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी भाजपाच्या सरोज अहिरे व उपसभापतिपदी भाजपाच्याच कावेरी घुगे यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेच्या उमेदवार नयना गांगुर्डे यांनी सभापतिपदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती-उपसभापतिपदासाठी सोमवारी (दि.१५) अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सभापतिपदासाठी भाजपाच्या सरोज अहिरे आणि शिवसेनेच्या नयना गांगुर्डे यांनी तर उपसभापतिपदासाठी भाजपाच्या कावेरी घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सेनेच्या नयना गांगुर्डे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सभापतिपदी सरोज अहिरे तर उपसभापतिपदी कावेरी घुगे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीवर तौलनिक संख्याबळानुसार भाजपा- ५, शिवसेना- ३ आणि राष्ट्रवादी- १ असे पक्षीय बलाबल आहे. समितीवर भाजपाच्या कावेरी घुगे, प्रियंका घाटे, भाग्यश्री ढोमसे, सरोज अहिरे व शीतल माळोदे, शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर, नयना गांगुर्डे व पूनम मोगरे आणि राष्ट्रवादीच्या समीना मेमन यांची नियुक्ती झालेली आहे.