अहमदनगरची चन्याबेग टोळी नाशकात बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात; दोन महिन्यात टोळीच्या चौघा सराईतांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 03:43 PM2017-12-18T15:43:58+5:302017-12-18T15:45:52+5:30
बेग टोळीचा साथीदार शार्पशूटर जेधे याची नाशिकरोडला सासूरवाडी असल्याचे सहायक आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले. जेधे आठवडाभरापूर्वी येथे आला होता; मात्र त्याचा फरार साथीदार किती दिवसांपासून शहरात होता, याबाबत तपास सुरू असल्याचे गोरे म्हणाले. फरार नईमच्या शोधासाठी पथक कार्यान्वित असल्याचे त्यांनी सांगितले. जेधेक डून गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नाशिक : शेजारील जिल्ह्यांमधून तडीपार केलेले किंवा मोक्कासारख्या मोठ्या गुन्ह्यांमधील फरार सराईत गुंडांची शहरात ये-जा वाढली आहे. सोनसाखळी चोरीसारख्या जबरी लुटीच्या गुन्ह्यांमध्ये या गुंडांचा वाढता सहभाग शहरातील कायदा सुव्यवस्थेला सुरुंग लावणारा ठरत आहे. अहमदनगरच्या चन्या बेग टोळीचा शहरात वावर वाढल्याची चर्चा सुरू आहे.
शेजारील जिल्ह्यांमधून हद्दपार किंवा तडीपार करण्यात आलेले गुंड शहरात आश्रय घेत असून, येथील स्थानिक गुन्हेगारी टोळीच्या काही बाहेरील सराईत गुन्हेगार येत असून, शहरातील विविध उपनगरांमध्ये वास्तव्य करीत गुन्हेगारीला खतपाणी घालत असल्याचे समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील चन्या बेग टोळीचा खास शार्पशूटर अंकुश रमेश जेधे (२४) हा सराईत गुन्हेगार मोक्कांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तो व त्याचा साथीदार नईम सय्यदसोबत शहरातील पाथर्डीफाटा, वासननगर परिसरात भटकंती करत होते. पोलिसांनी जेधेचा सिनेस्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळल्या असून, त्याचा साथीदार नईम हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. विशेष म्हणजे तो रात्रीच्या वेळी पायी पळून जाण्यास यशस्वी ठरला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. चण्या बेग टोळी चालविणारा कुविख्यात गुंड सागर बेग याचा जवळचा नातेवाईक असलेला जेधे याने सोनसाखळी चोरीसारखे गुन्हेदेखील के ल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जेधेकडून अंगझडतीमध्ये मॅगझिनचे तीन राउंड असलेले देशी बनावटीचे पिस्तूल कमरेला लावलेले आढळून आले.
आॅक्टोबरमध्ये तिघांच्या आवळल्या मुसक्या
आॅक्टोबरमध्ये बेग टोळीशी संबंधित व अहमदनगरच्या मोक्कातील सराईत गुन्हेगार शाहरूख शेख, सागर पगारे, बारकू अंभोरे यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्याकडून दोन विदेशी पिस्तूल, चाळीस जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. हे तिघे सराईत गुंडदेखील पाथर्डीफाटा परिसरातच वास्तव्यास होते आणि जेधेलाही त्याच भागातून ताब्यात घेण्यात आले. हे सर्व गुंड बेग टोळीशी संबंधित असल्याचे तपासात पुढे आले आहे.
गुंड जेधे नाशिकरोडचा जावई
बेग टोळीचा साथीदार शार्पशूटर जेधे याची नाशिकरोडला सासूरवाडी असल्याचे सहायक आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले. जेधे आठवडाभरापूर्वी येथे आला होता; मात्र त्याचा फरार साथीदार किती दिवसांपासून शहरात होता, याबाबत तपास सुरू असल्याचे गोरे म्हणाले. फरार नईमच्या शोधासाठी पथक कार्यान्वित असल्याचे त्यांनी सांगितले. जेधेक डून गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.