राज्यात तीन लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 01:28 AM2021-05-27T01:28:40+5:302021-05-27T01:29:36+5:30
रब्बी हंगाम संपून खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी अद्याप राज्यातील रब्बी पिकांच्या खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू झालेले नसल्याने या केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान राज्यातील १६ जिल्ह्यांमधून तीन लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
नाशिक : रब्बी हंगाम संपून खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी अद्याप राज्यातील रब्बी पिकांच्या खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू झालेले नसल्याने या केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान राज्यातील १६ जिल्ह्यांमधून तीन लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
जळगाव आणि बुलडाणा या दोन जिल्ह्यांना ६० हजार क्विंटल रब्बी मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, पुणे आणि सांगली या जिल्ह्यांना केवळ प्रतिजिल्हा ५०० क्विंटल रब्बी मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्यात मार्केटिंग फेडरेशनमार्फत रब्बी पणन हंगाम २०२०-२१ मध्येे आधारभूत किमतीवर शेतमाल खरेदी करण्यात येत असून, त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील महिन्यापासून शेतकऱ्यांनी ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र रब्बी हंगाम संपूण खरीप हंगाम सुरू होण्याची वेळ आली असली तरी अद्याप जिल्हा केंद्रांना खरेदी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
यामुळे अद्याप एकाही जिल्ह्यात खरेदी सुरू झालेली नाही. रब्बी हंगामातील इतर पिकांचे उद्दिष्ट निश्चित झाले नसले तरी रब्बी मका खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, एकूण तीन लाख क्विंटल मका खरेदी करण्यात येणार आहे. अद्याप खरेदी सुरू झाले नसल्याने शेतकरी अडचणीत असून, खरीप हंगामासाठी भांडवल कसे उभे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.