अखेर एअर डेक्कनची विमानसेवा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:51 AM2018-11-21T01:51:09+5:302018-11-21T01:52:15+5:30
सामान्य माणसासाठी हवाई स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या माध्यमातून विमानसेवा सुरू करणाऱ्या एअर डेक्कन कंपनीला ती नीट चालविता आली नाही आणि ही सेवा बंद पडली. त्याची गंभीर दखल घेत भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने कंपनीची राज्यातील सेवाच रद्दबातल ठरवली आहे. यासंदर्भात कंपनीला पत्रही देण्यात आले आहे.
नाशिक : सामान्य माणसासाठी हवाई स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या माध्यमातून विमानसेवा सुरू करणाऱ्या एअर डेक्कन कंपनीला ती नीट चालविता आली नाही आणि ही सेवा बंद पडली. त्याची गंभीर दखल घेत भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने कंपनीची राज्यातील सेवाच रद्दबातल ठरवली आहे. यासंदर्भात कंपनीला पत्रही देण्यात आले आहे.
कंपनीच्या वतीने उडान अंतर्गत प्रादेशिक जोडणीसाठी अनेक मार्गांवर सेवा देण्याची हमी देण्यात आली होती. एअर डेक्कन कंपनीच्या वतीने नाशिकमध्ये गेल्या वर्षीच्या अखेरीस नाशिक - मुंबई आणि नाशिक- पुणे अशी सेवा देण्यास प्रारंभ झाला होता. ओझर विमानतळावरून ही सेवा सुरू झाल्यानंतर कंपनीने मुंबई-औरंगाबाद, मुंबई-कोल्हापूर, मुंबई- जळगाव, मुंबई - सोलापूर अशा विमानफेºया सुरू करण्यात आल्या होत्या. या सेवेमुळे कमी दरात नागरिकांना मुंबईसारख्या ठिकाणी जोडण्यात येत होते.
नाशिकमधून ही सेवा सुरू झाल्यानंतर सात ते आठ दिवस बुकिंगच घेतली नव्हती आणि नंतर मुंबईच्या विमानतळावर टाइम स्लॉट मिळत नसल्याचे निमित्त करून सेवा बंद पडली. यासंदर्भात नवी दिल्ली येथे जाऊन हवाई मंत्रालयासमोर खासदार गोडसे यांनी टाइम स्लॉट मिळवून दिला. परंतु कंपनीला सेवा चालविता आली नाही. मध्यंतरी पुण्याची सेवा बंद करण्यात आली आणि त्यानंतर मुंबईची सेवाही पूर्णत: बंद झाली.
केंद्र सरकारच्या या योजनेत नागरिकांना सवलतीच्या दरात हवाई प्रवास करता येणार होता. तसेच कंपनीला निवडलेल्या मार्गावर अन्य स्पर्धक कंपनीची सेवा न देताच मक्तेदारी देण्यात आली होती. त्याचा लाभ कंपनीला उठवता आला नाही.
अनामत रक्कमही जप्त
मध्यंतरी अनेक मार्गांवर सेवा सुरू झाल्याने कंपनीकडे प्रशिक्षित वैमानिक नसल्याचे तर कधी नवीन वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचे कारण पुढे करण्यात येत होते. परंतु अखेरीस ही सेवा चालविणे क्षमतेच्या पलीकडे गेल्याने सेवाच बंद पडली त्यामुळे शासनाच्या कराराचा भंग झाल्याने भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने २७ जुलैस एअर डेक्कनला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र त्यावर समाधानकारक उत्तर दिले गेले नाही त्यामुळे ही कंपनीची उडानमधील सेवा रद्द करण्यात आली आहे.