एअर डेक्कनची सप्टेंबर अखेर विमानसेवा
By admin | Published: July 10, 2017 01:28 AM2017-07-10T01:28:18+5:302017-07-10T01:28:46+5:30
नाशिक : विमानसेवेबाबत चर्चा होऊन त्यात नाशिकची विमानसेवा येत्या सप्टेंबर अखेरपासून सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दिल्ली येथे विंग २०१७ या ‘उडो सब जुडो’ चर्चेत उडान योजनेंतर्गत सुरू करावयाच्या विमानसेवेबाबत चर्चा होऊन त्यात नाशिकची विमानसेवा येत्या सप्टेंबर अखेरपासून सुरू करण्याचे आश्वासन एअर डेक्कन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राजू व जयंत सिन्हा यांच्या हस्ते या विंग २०१७ चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सिव्हिल एव्हिएशनचे प्रधान सचिव चोभे, एअरपोर्ट अॅथोरेटी आॅफ इंडियाचे मनोज खुल्लर तसेच सर्व केंद्रीय अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक राज्याने उडान योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी काय सवलती दिल्या जातील, याची माहिती दिली. महाराष्ट्र सिव्हिल एव्हिएशनच्या प्रधान सचिव वत्सला नायर यांनी महाराष्ट्र शासनाने काय सवलती देणार असल्याचे सांगितले. या चर्चासत्रात एअर एशिया इंडिया लि., टाटा सीआ एअरलाइन्स लि., स्टार एअर घोडावत एंटरप्राइजेस प्रा. लि, टूरजेट, जेट एअरवेज इंडिया लि; स्पाइसजेट लि; झेक्सस एअर सर्व्हिसेस प्रा. लि., डेक्कन चार्ट्स प्रा. लि., महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लि., इंडिगो आणि एअर लाइन एलाइड सर्व्हिसेस लि. या दहा एअरलाइन्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. कार्यशाळेच्या दुसऱ्या चर्चासत्रात सिव्हिल एव्हिएशन अधिकाऱ्यांसमवेत सिव्हिल एव्हिएशनच्या प्रधान सचिव वत्सला नायर, यू. पी. ककाणे, खासदार हेमंत गोडसे यांनी एअर इंडिया तसेच एअर डेक्कनच्या अधिकाऱ्यांशी नाशिक विमानसेवा सुरू करण्याबाबत चर्चा केली.