लढाऊ रूद्र, ध्रूव अन् चित्ता हेलिकॉप्टरच्या हवाई कसरती; 'कॅट्स'च्या४१व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा थाटात

By अझहर शेख | Published: May 22, 2024 04:32 PM2024-05-22T16:32:27+5:302024-05-22T16:33:06+5:30

हेलिकॉप्टरमधून युद्धभूमीवर उतरणारे सैनिक त्यांना पुरविण्यात येणारी रसद अन् शत्रूच्या छावणीवर भारतीय सैनिकांकडून चढविला जाणारा हल्ला असा युद्धभूमीचा थरार यावेळी ‘कॅट्स’मध्ये अनुभवयास आला.

Air exercises of combat helicopters Rudra Dhruv and Cheetah The convocation ceremony of the 41st batch of 'Cats' is grand | लढाऊ रूद्र, ध्रूव अन् चित्ता हेलिकॉप्टरच्या हवाई कसरती; 'कॅट्स'च्या४१व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा थाटात

लढाऊ रूद्र, ध्रूव अन् चित्ता हेलिकॉप्टरच्या हवाई कसरती; 'कॅट्स'च्या४१व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा थाटात

नाशिक : लढाऊ हेलिकॉप्टर म्हणून ओळखले जाणारे रूद्र, ध्रूव, चित्ता अन् चेतकच्या अंगावर शहारे आणणाऱ्या हवाई कसरतींनी उपस्थित लष्करी अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यांची पारणे फेडली. हेलिकॉप्टरमधून युद्धभूमीवर उतरणारे सैनिक त्यांना पुरविण्यात येणारी रसद अन् शत्रूच्या छावणीवर भारतीय सैनिकांकडून चढविला जाणारा हल्ला असा युद्धभूमीचा थरार यावेळी ‘कॅट्स’मध्ये अनुभवयास आला.

निमित्त होते, गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) प्रशिक्षणार्थी वैमानिक, प्रशिक्षक आणि आरपीएस अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ४१व्या तुकडीच्या दीक्षान्त सोहळ्याचे. गुरूवारी (दि.२२) सकाळी येथील लष्करी हवाईतळावर आर्टीलरी सेंटरमधील बॅन्डपथकाच्या धूनवर प्रशिक्षणार्थींच्या तुकडीच्या दिमाखदार संचलनाने सोहळ्याला प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी आर्मी एव्हीएशन कोर चे महानिर्देशक व कर्नल कमांडन्ट अतीविशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी हे होते. प्रमख पाहुणे म्हणून ब्रिगेडिअर सचिन दुबे, कर्नल डी.के चौधरी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्रासह एव्हिएशन विंग्स, क्वाॅृलिफाइड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर ‘बॅच’ आणि आरपीएएस विंग बॅच देऊन गौरविण्यात आले. तुकडीत २३लढाऊ वैमानिक, ८ लढाऊ हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर, ७ आरपीएएस इन्स्ट्रक्टर आणि ४ मानवविरहित आरपीएएस विमानाचे वैमानिक असे एकुण ४२ अधिकाऱ्यांचा समावेश होता.

यांचा झाला सन्मान

कॅ.आशिक कृष्णकुमार (फ्लेजिंग ट्रॉफी), कॅ. इशांत चांदेवाल (पी.के गौर स्मृतीचिन्ह), कॅ. आशिष रांगी (सिल्वर चिता व एस.के शर्मा ट्रॉफी),कॅ. विस्मय भागवत, मेजर शशिकांत (ग्राउंड सब्जेक्ट) मेजर सुधांशु शर्मा (मे.प्रदीप अग्रवाल ट्रॉफी ), कॅ. कार्तिक शर्मा (आरपीएएस मेरिट प्रथम), मेजर आशीत आनंद (फ्लाइंग इन्स्ट्रक्टर ओव्हरऑल मेरिट-प्रथम) यांना विशेष व उत्कृष्ट अशा उल्लेखनीय कार्य प्रशिक्षणादरम्यान केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

सुरक्षित उड्डाण हेच प्रत्येक लढाऊ वैमानिकाचे ध्येय असले पाहिजे. हेलिकॉप्टर उड्डाणादरम्यान नियंत्रण कौशल्य हे महत्वाचे असते. युद्धभूमीवर किंवा नैसर्गिक आपत्तीच्यावेळी बचावकार्यात योगदान देताना वैमानिकांनी सुरक्षेला सर्वोच्चस्थानी ठेवावे. धोक्याची लाल रेषा कधीही ओलांडू नये. प्रशिक्षणात घेतलेले धडे व एसओपीचा विसर पडू देऊ नये. उज्ज्वल आर्मी एव्हिएटर म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी या प्रशिक्षणाचा पुढे मोठा फायदा तुम्हाला करिअरमध्ये होईल. कॅट्स दिवसेंदिवस प्रगतीचे टप्पे गाठत असून लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणासह एकुण १७ अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देत उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून आपला आलेख उंचावत आहे, याचा अभिमान वाटतो.
- लेफ्टनंट जनरल अजयकुमार सुरी , कर्नल कमान्डंट आर्मी एव्हिएशन कोर.

Web Title: Air exercises of combat helicopters Rudra Dhruv and Cheetah The convocation ceremony of the 41st batch of 'Cats' is grand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.