एअर इंडिया विमानसेवेसाठी उत्सुक
By admin | Published: February 28, 2016 11:50 PM2016-02-28T23:50:39+5:302016-02-28T23:52:22+5:30
नवा प्रस्ताव : पुन्हा मार्चचा मुहूर्त
ओझर टाउनशिप : नाशिकला हवाईसेवा सुरू करण्यासाठी अनेक विमान कंपन्यांनी तयारी दर्शविली असली तरी प्रत्यक्षात नाशिकच्या विमानसेवेला मुहूर्त काही सापडत नसल्याचे चित्र आहे. आता मात्र एअर इंडियानेच मार्चपासून नाशिक व हुबळी ही शहरे मुंबईला जोडण्याचे उद्दिष्ट त्यांच्या वर्षपूर्तीच्या पुस्तिकेत छापल्याने पुन्हा एकदा नाशिककरांच्या हवाईसेवा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
एअर इंडियाचे प्रबंध निर्देशक तथा अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियातर्फे वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या वार्षिक पुस्तिकेतच याबाबतचे सूतोवाच केले आहे. या पुस्तिकेत एअर इंडियाच्या भावी वाटचालीसंदर्भात आवश्यक ते नियोजन व त्यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली जाते. एअर इंडियाच्या ‘कनेक्टिंग इंडिया’ या उपक्रमांतर्गत देशातील दुसऱ्या क्रमांकाची शहरे जोडण्याचे उद्दिष्ट चालू वर्षी ठेवले आहे. त्या अंतर्गत मुंबई ते सुरत, ग्वालिअर-दुर्गापूर ते दिल्ली ही विमानसेवा सुरू केली असून, जानेवारीत गोरखपूर ते दिल्ली हवाईसेवा सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर मार्चपासून नाशिक ते मुंबई व हुबळी ते मुंबई, विजयवाडा ते बेंगळुरू, तसेच सायंकालीन हवाईसेवेच्या माध्यमातून भोपाळ ते मुंबई ही सेवा सुरू करण्याचा एअर इंडियाचा प्रयत्न राहणार आहे. तसेच दिल्ली ते देहराडून आणि दिल्ली ते अलाहाबाद यांच्या दरम्यान जास्तीत जास्त विमान फेऱ्या मारण्याचे यावर्षीचे एअर इंडियाचे उद्दिष्ट असल्याचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी त्यांच्या वार्षिक पुस्तिकेत नमूद केले आहे. यासंदर्भातील माहिती एअर इंडियाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कळविली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून नाशिकच्या विमानसेवेचा मुहूर्त कदाचित पुढच्याच महिन्यात होण्याची सुचिन्हे आहेत. (प्रतिनिधी)