फटाक्यांचा उडाला ‘बार’;नाशिकची हवा झाली बेजार;वायू प्रदूषणाची पातळी पोहोचली २५६ वर

By अझहर शेख | Published: November 13, 2023 05:57 PM2023-11-13T17:57:26+5:302023-11-13T17:58:37+5:30

नाशिकच्या हवेच्या गुणवत्तेवर मोठा दुष्परिणाम.

Air of Nashik became bad Air pollution level reached 256 | फटाक्यांचा उडाला ‘बार’;नाशिकची हवा झाली बेजार;वायू प्रदूषणाची पातळी पोहोचली २५६ वर

फटाक्यांचा उडाला ‘बार’;नाशिकची हवा झाली बेजार;वायू प्रदूषणाची पातळी पोहोचली २५६ वर

नाशिक : शहरात लक्ष्मीपूजनाला नाशिककरांनी फटाक्यांचा जमके ‘बार’ केला. यामुळे वातावरणातील हवेच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. लक्ष्मीपूजनाच्या अगोदर समाधानकारक नाशिकच्या हवेचा स्तर अचानकपणे रविवारी (दि.१२) ढासळला. नाशिकच्या हवेच्या गुणवत्तेवर मोठा दुष्परिणाम झाल्याने वायू प्रदूषण धोकादायक पातळीपर्यंत जाऊन पोहोचले. प्रदूषण पातळी २५६पर्यंत गेल्याची नोंद प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आली.

अल्हाददायक वातावरणाचे शहर अशी ओळख असलेल्या नाशिकची हवा धनत्रयोदशीपासून बिघडण्यास सुरुवात झाली. दिवाळीची धामधूम धनत्रयोदशीपासून सुरू झाली. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.११) हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११८ इतका होता; मात्र लक्ष्मीपूजनाच्या रात्री रविवारी यामध्ये कमालीची वाढ झाली. सायंकाळी साडेसहा वाजेपासूनच शहर व परिसरासह उपनगरांमध्ये फटाक्यांची जोरदार आतषबाजीला प्रारंभ झाला. मध्यरात्री १ वाजेपर्यंत फटाक्यांचा आवाज कानी येत होता. यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक रविवारी रात्री २०३पर्यंत वाढला होता. ध्वनीप्रदूषणाची पातळी जरी कमी राहिली असली तरी फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली. यामुळे नाशिकची हवा बिघडली. हवेचा गुणवत्ता निर्देशांक दोनशेच्या पुढे सरकल्यामुळे प्रदूषणाचा धोकादायक स्तर असल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून (सीपीसीबी)करण्यात आली आहे


पहाटे वातावरणात वाढले धुरके
सोमवारी पहाटे प्रदूषणाची पातळी वातावरणात दिसून आली. हवेत पांढऱ्या धुरक्यांचा थर मोठ्या प्रमाणात साचलेला होता. रविवारी रात्री शहरातील प्रत्येक गल्लीबोळात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. याचा परिणाम सोमवारी सकाळी पाहावयास मिळाला. पांढरे धुरके वातावरणात मोठ्या प्रमाणात मिसळले होते.


‘ग्रीन दिवाळी’चा पडला विसर
नाशिक शहरात प्रदूषणमुक्त किंवा ग्रीन दिवाळी यंदा साजरी होऊ शकली नाही. शासकीय यंत्रणांकडून करण्यात आलेल्या आवाहनाला नाशिककरांकडून हरताळ फासला गेला. राज्यात मुंबई, पुणेसारख्या शहरांमध्ये वायू प्रदूषण कमालीचे वाढल्याने दिवाळीच्या निमित्ताने फटाके फोडू नका, ग्रीन दीपावली साजरी करा, असे आवाहन केले जात होते; मात्र या आवाहनाला नाशिकमध्ये फारसा प्रतिसाद मिळालेला दिसून आला नाही.

जीव गुदमरायला झाला...
लक्ष्मीपूजनाच्या रात्री नाशिक शहर व उपनगरांमधून फेरफटका मारताना वातावरणात पसरलेला धूर व दुर्गंधीमुळे नागरिकांचा जीव गुदमरायला झाला होता. दम्याचे विकार असलेल्या नागरिकांना त्याचा अधिक त्रास जाणवला. तसेच, सामान्य नागरिकांनासुद्धा श्वासोच्छ्वास करताना अडथळा निर्माण होत असल्याचा अनुभव आला.

Web Title: Air of Nashik became bad Air pollution level reached 256

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.