औद्योगिक वसाहतीला वायुप्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:20 AM2018-05-14T00:20:54+5:302018-05-14T00:20:54+5:30

प्रदूषणविरहित हरित शहर अशी नाशिकची असलेली ओळख पुसली जात असून, आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेले शहर अशी नाशिकची अवस्था होऊ लागली आहे.

 Air pollution is detected in industrial estates | औद्योगिक वसाहतीला वायुप्रदूषणाचा विळखा

औद्योगिक वसाहतीला वायुप्रदूषणाचा विळखा

Next

नाशिक : प्रदूषणविरहित हरित शहर अशी नाशिकची असलेली ओळख पुसली जात असून, आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेले शहर अशी नाशिकची अवस्था होऊ लागली आहे. औद्योगिक वसाहतीसह शहर परिसरही वायुप्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालला असताना, प्रदूषण नियंत्रण विभागाकडून मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाने अद्याप गेल्या एप्रिल महिन्याची प्रदूषणाची आकडेवारीही संकेतस्थळावर अद्ययावत केलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रदूषणाविषयी तांत्रिकदृष्ट्या असलेल्या अज्ञानाचा फायदा घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक कार्यालय प्रदूषणाची वास्तविकता लपविण्याचा प्रयत्न करीत आहे काय, असा सवाल निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या परिसरात धूलिकणांचे प्रमाण अधिक असल्याचे गेल्या काही दिवसांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतीतील एसपीएम (सस्पेंड पार्टिकुलेट मॅटर- १० मायक्रॉन आणि त्यापेक्षा कमी आकाराचे धूलिकण) मोठ्या प्रमाणात वाढले असून, संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार वातावरणातील एसपीएमच्या घटकांनी प्रदूषण मापनाच्या प्रत्येकवेळी कमाल मर्यादा ओलांडल्याचे दिसून येते, तर रहिवासी परिसरात मार्च महिन्यातील आक डेवारीनुसार १० मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या धूलिकणांचे म्हणजे श्वसनातून शरीरात पोहोचणाºया हानिकारक घटकांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारीपासून मार्चपर्यंतच्या तीन महिन्यांत २६ वेळा प्रदूषणाची चाचणी करण्यात आली. त्यात महिन्यात तब्बल ९ वेळा वातावरणातील धूलिकणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच काळात वातावरणातील धूलिकणांचे अर्थात आरएसपीएमचे किमान प्रमाण ३२ एम क्यूबपर्यंत पोहोचले असून, कमाल प्रमाणाने तब्बल १७३ एमक्यूबचा टप्पा गाठला आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीत १ जानेवारी ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत किमान एसपीएम घटकाचे प्रमाण ६२ एमक्यूब, तर कमाल २९९ एमक्यूब नोंदवले गेले असून, सस्पेंड पार्टिकुलर मॅटर अर्थात एसपीएम घटकांवर नियंत्रण मिळविण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाला एकदाही यश आलेले नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
जनजागृती होईल कशी?
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरील आकडेवारी नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम करते. अधिक यांना आणि नागरिकांना कोणत्या भागात प्रदूषणाचे प्रमाण किती आहे, तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी करावयाची उपाययोजना करता येणे शक्य आहे. परंतु गेल्या महिनाभरापासून संकेतस्थळावर आकडेवारीच अद्ययावत केलेली नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातील अधिकाºयांचीच जागरूकता करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title:  Air pollution is detected in industrial estates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.