नाशिकहून गोव्यासाठी जानेवारीपासून हवाई सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 01:27 AM2021-12-10T01:27:01+5:302021-12-10T01:27:41+5:30
केंद्र शासनाच्या उडान अंतर्गत सुरू होणाऱ्या अनेक विमान सेवा बंद असल्या तरी येत्या जानेवारीपासून ओझरहून गोव्यासाठी विमान सेवा सुरू होणार आहे, तर दिल्ली आणि हैदराबादची सेवादेखील याच दरम्यान सुरू होणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यासंदर्भात अधिकृत पत्र पालकमंत्री छगन भुजबळ यांना पाठविले आहे.
नाशिक : केंद्र शासनाच्या उडान अंतर्गत सुरू होणाऱ्या अनेक विमान सेवा बंद असल्या तरी येत्या जानेवारीपासून ओझरहून गोव्यासाठी विमान सेवा सुरू होणार आहे, तर दिल्ली आणि हैदराबादची सेवादेखील याच दरम्यान सुरू होणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यासंदर्भात अधिकृत पत्र पालकमंत्री छगन भुजबळ यांना पाठविले आहे.
नाशिकच्या विमानतळावरून सध्या अलाईन्स एअर, स्टार एअर ट्रु जेट या कंपन्यांच्या अहमदाबाद, पुणे, बेळगाव, हैदराबाद शहरांसाठी सेवा सुरू आहेत. मात्र, उडान अंतर्गत अनुदानित स्वरूपातच अनेक मार्गांवर विमान सेवा सुरू करू इच्छिणाऱ्या कंपन्यानी केंद्र शासनाकडून मान्यता घेतली; मात्र मान्यताच सुरू केलेली नाही. यासंदर्भात नाशिकमधील उद्योजक मनीष रावळ यांच्यासह अन्य मान्यवरांनी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन दिल होते. पालकमंत्री भुजबळ यांनी यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र पाठवून अन्य प्रलंबित मार्गांवरील सेवा सुरू करण्याची सूचना केली होती. त्याला ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रत्युतरादाखल दिलेल्या पत्रात स्पाईस जेटची सेवा येत्या जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे कळविले आहे. याच कंपनीची दिल्ली आणि हैदराबाद सेवादेखील जानेवारी महिन्यापासून मार्गी लागणार आहे.